
विमान प्रवाशांना महागाईचा मोठा फटका बसणार आहे. एअर इंडियाने दरवाढ केल्यानंतर आता देशातील आघाडीची विमान कंपनी इंडिगोने (IndiGo) देखील आपल्या तिकीट दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. मध्यम पूर्वेतील (Middle East) वाढत्या तणावामुळे विमान इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने कंपनीने हा फ्यूल सरचार्ज लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, १४ मार्च २०२६ रोजी रात्री १२:०१ वाजल्यापासून बुक होणाऱ्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय तिकिटांवर हा फ्यूल सरचार्ज आकारला जाईल. प्रवासाच्या अंतरावरून हा अधिभार ४२५ रुपयांपासून ते २,३०० रुपयांपर्यंत असू शकतो.
विमान कंपनीने सांगितले की, सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीमुळे इंधनाच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. IATA च्या जेट फ्यूल मॉनिटरनुसार, या प्रदेशात इंधनाचे दर ८५ टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. विमान चालवण्याच्या एकूण खर्चात इंधनाचा वाटा मोठा असतो, त्यामुळे ही दरवाढ करणे कंपनीसाठी अपरिहार्य झाले आहे. ग्राहकांवर जास्त बोजा पडू नये म्हणून इंधनाच्या वाढलेल्या किमतीच्या तुलनेत कमीत कमी भार प्रवाशांवर टाकल्याचे इंडिगोने म्हटले आहे.
एअर इंडियाकडूनही यापूर्वीच घोषणा
इंडिगोच्या आधी, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसने १२ मार्चपासून प्रत्येक देशांतर्गत तिकिटावर ३९९ रुपये फ्यूल सरचार्ज लागू करण्याची घोषणा केली होती. याशिवाय सार्क (SAARC) देश, आफ्रिका आणि दक्षिण-पूर्व आशियातील विमान प्रवासासाठीही सरचार्जमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. एकापाठोपाठ एक प्रमुख विमान कंपन्यांनी फ्यूल सरचार्ज लागू केल्यामुळे सर्वसामान्यांसाठी आता विमान प्रवास अधिक खर्चिक ठरणार आहे.

























































