महाराष्ट्रात संवेदनाहीन सरकार; कोल्हापुरात अल्पवयीन मुलीची हत्या झाली तिथेच मिध्यांचा इव्हेंट! – अजय चौधरी

महाराष्ट्रामध्ये संवेदनाहीन सरकार आहे. कोल्हापुरात एका अल्पवयीन मुलीची हत्या होते, त्याच कोल्हापुरात सरकार इव्हेंट करतंय हे निषेधार्य आहे, अशी तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे विधिमंडळातील गटनेते आणि आमदार अजय चौधरी यांनी दिली. बदलापूरमधील अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे तोंडाला काळी फित बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

गेल्या 10 दिवसांमध्ये अत्याचाराच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत विचारले असता अजय चौधरी यांनी सर्व घटना ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ते पुढे म्हणाले की, कोर्टाने आदेश दिल्याने महाविकास आघाडीला बंद मागे घ्यावा लागला. मात्र महाविकास आघाडीतर्फे महाराष्ट्रभर निषेध आंदोलन होत आहे.

बहिणींवर अत्याचार होत असताना कंसमामा निर्लज्जासारखा राख्या बांधून फिरतोय! भर पावसात उद्धव ठाकरे मिंध्यांवर गरजले

महाराष्ट्रात संवेदनाहीन सरकार आहे. रोज कुठे ना कुठे अत्याचाराची घटना घडत आहे. कोल्हापुरात अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या झाली. त्याच कोल्हापुरात दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री असे दोन फूल एक हाफ सरकार इव्हेंट करत फिरत होते. फटाके वाजवत होते. हे निषेधार्य आहे. हे सरकार संवेदनाशून्य असल्याची टीकाही अजय चौधरी यांनी केली.

महाविकास आघाडीच्या बंदविरोधात गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका केली होती. त्यांची चावी कुणाकडे आहे हे सर्वांना माहिती आहे. भाजपची लोकं त्यांना चालवत आहेत. जिथे त्यांना अडचण होतेय असे वाटते तिथे कोर्टात जाण्यासाठी त्यांनी प्रवृत्त करण्याचे काम भाजप करते. मात्र सामाजिक विषयावर महाराष्ट्रातील जनता आंदोलन करणार असेल आणि त्याच्या विरोधात आपण जात असाल तर हे अयोग्य असल्याचेही अजय चौधरी यावेळी म्हणाले.