अजित दादांच्या अपघाताला क्रिमिनल अँगल, नवीन पुराव्यांसह रोहित पवार पत्रकार परिषद घेणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणात क्रिमिनल अँगल असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी सखोल चौकशीची मागणी केली.

विधीमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, “अनेक दिवसांपूर्वी अधिवेशनात अजित दादांच्या अपघाताची नाहीतर घातपाताची चर्चा व्हावी यासाठी आम्ही अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल तसेच 193 चा प्रस्ताव असेल अशा विविध माध्यमातून हा मुद्दा चर्चेत यावा अधिवेशनामध्ये यासाठी आम्ही सर्वजणच प्रयत्न करत आहोत. पण दुर्दैव असं की महाराष्ट्र राज्याच्या सेशनमध्ये या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादांचा अपघात जो झाला त्याच्याबद्दल साधी चर्चा करण्याची वेळ सुद्धा तिथे दिली जात नाही. आत्ताच काही वेळापूर्वी अध्यक्ष महोदयांना मी भेटलो, विनंती केली की लवकरात लवकर अधिवेशन संपण्यापूर्वी या बाबतीतली चर्चा व्हावी. महाराष्ट्रात तर चर्चा होतच नाही, पण हा विषय हा सेंट्रल गव्हर्मेंटचा सुद्धा असल्यामुळे सीबीआय सेंट्रल गव्हर्मेंटच्या अंतर्गत येतं, त्याच्याचबरोबर एविएशन मंत्रालय त्याच्या अंतर्गत येतं. पण हा मुद्दा संसदेतसुद्धा चर्चेला कदाचित मुद्दामून आणला जात नाही, ही दुर्दैवी गोष्ट आहे असे रोहित पवार म्हणाले.

अध्यक्षांनी सांगितलंय, उद्या नाही तर सोमवारी या बाबतीतली चर्चा आम्ही लावू. त्यामुळे वाट बघूया सोमवारपर्यंत काय होतंय. पण दुर्दैव असा की एवढा महत्त्वाचा मोठा मुद्दा असून सुद्धा हा खरंतर अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी चर्चेत यायला पाहिजे होता, पण दुर्दैवाने तो आलेला नाही. विधान परिषदेमध्ये शशिकांत शिंदे साहेब, अमोल मिटकरी हे सुद्धा प्रयत्न करत आहेत. विधानसभेत अधिवेशनामध्ये मी स्वतः असेल व आमचे सर्व इतर नेते ज्याच्यामध्ये जयंत पाटील साहेब असतील, इतर पक्षाचे नेते हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत, पण ती काय चर्चा मुद्दामून कदाचित करून दिली जात नाही असं आपल्याला बघायला मिळत आहे असेही रोहित पवार यांनी सांगितले.

या अपघाताला क्रिमिनल अँगल असू शकतो, म्हणून आपण क्रिमिनल इन्वेस्टिगेशन तिथं मागत आहोत. एफआयआर, सीबीआय इन्क्वायरी, सीआयडी त्याचाच एक भाग झाला. सीबीआयच्या बाबतीत आम्हाला दिल्लीत गेल्यानंतर असं कळतंय की अजूनपर्यंत महाराष्ट्र राज्याने प्रस्ताव हा दिल्लीपर्यंत सीबीआयचा दुर्दैवाने पाठवलेला नाही. कुणी ना कोणीतरी मोठा व्यक्ती या विषयाच्या पाठीमागे आहे, म्हणूनच कुठेतरी व्हीएसआरला वाचवलं जातंय असं आमचं आधीपासूनच मत आहे. पण आतापर्यंत जी माहिती आम्ही पुढे आणली होती ती थोडक्यात माहिती होती. बरीचशी माहिती अजून आमच्यापर्यंत आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारकडून काय केलं जातं हे आपल्याला लागेल आणि नंतर नाइलाज होऊन जी काही शेवटची माहिती आहे आणि मोठी माहिती आहे ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून लोकांकडून आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही असे रोहित पवार म्हणाले.

सत्तेतल्या अनेक लोकांचं व्हीएसआरला समर्थन आहे. खरं तर समर्थन जर अजित दादांना न्याय देण्यासाठी असलं असतं तर आतापर्यंत व्हीएसआर कंपनी ही बंद झाली असती. सीबीआय इन्क्वायरी ही सुरू झाली असती. सीआयडीची चौकशी सुद्धा पार पुढे गेली असती आणि एफआयआर सुद्धा झाला असता. पण याच्यात आपण बघितलं एफआयआर झालेला नाही. व्हीएसआरमधून सत्तेतलेच काही मोठे लोक अजून सुद्धा प्रवास करत आहेत. सीबीआयकडे प्रस्ताव राज्य शासनाने अजूनपर्यंत पाठवलेला नाही. त्यामुळे सत्तेत असणारे अजित दादांबरोबर अनेक वर्ष काम केलेले अनेक लोक किती वेळा स्मरणपत्र देणारे हे त्यांनाच माहिती आहे. खरं तर सत्तेत राहण्याचं कारण असतं की लोकांना न्याय देता यावं, पण तुम्ही जर तुमच्याच नेत्याला न्याय देत नसाल तर लोकांना कधी तुम्ही न्याय देणार? हा प्रश्न आता लोकांना सुद्धा पडायला लागलेला आहे असे रोहित पवार म्हणाले.

मी महाराष्ट्रामध्ये या अधिवेशनात अल्पकालीन चर्चा असेल, लक्षवेधी असेल त्याच्यातून हा मुद्दा मांडला होता. तो ऑनलाईन सुद्धा टाकला होता, पण दुर्दैव असून तो अजून तिथपर्यंत सिलेक्ट झालेला नाही, नाहीतर तो चर्चेत आलेला नाही. मग महाराष्ट्रात कुठेच काही होत नाही असं दिसल्यानंतर एविएशन मंत्रालय दिल्लीमध्ये येतं, सीबीआय दिल्लीमध्ये येतं आणि मग तिथे जाऊन तिथे असणारे जे मोठे नेते, तिथे योगायोगाने पार्लमेंट सुद्धा सुरू आहे, मग समाजवादी पक्ष असेल, त्याच्याबरोबर तृणमूल काँग्रेस पक्ष असेल, नाहीतर आपले इतर जे महत्त्वाचे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना भेटलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे नेते आणि या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल जी गांधी यांना भेटलो. खरगेजींना जे अप्पर हाऊसचे नेते आणि विरोधी पक्षनेते त्यांना भेटलो आणि त्यांना हीच विनंती केली की इथं एफआयआर घेतला जात नाही असेही रोहित पवार म्हणाले .

एफआयआर करण्याचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा आहे, पण तो अधिकार असताना सुद्धा हा आम्हाला देण्याची इच्छा असताना आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन सुद्धा तो आमचा स्वीकारला जात नाही. मग कुठेतरी लोकशाही अडचणीत आली असं आमचं म्हणणं होतं आणि त्यांनी मान्य केलं. त्यामुळे जर तुम्ही राहुल गांधी यांचे ट्वीट पाहिलं असेल त्यांनी त्यांच्या खासदारांना आदेश दिलेले, पुढच्या काही दिवसांमध्ये या बाबतीतली चर्चा होताना तुम्हाला दिसणार आहे. सीबीआयचा मुद्दा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि अनेक लोकांना प्रश्न आहे की व्हीएसआरला वाचवलं जातंय. त्यामुळे त्यांच्याकडे काही पुरावे दिलेलेत, त्या बाबतीत ते काय करतात येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना बघावं लागेल असे रोहित पवार म्हणाले.

एक आपण समजून घेतलं पाहिजे की अजित दादा हे माझे काका होते, आमचे नेते होते. अमोल मिटकरींसाठी अजित दादा हे त्यांचे नेते होते. त्यांनी त्यांच्याबरोबर जवळून काम केलेलं आहे. गेले 40 वर्ष मी लहानाचा मोठा त्यांच्या सहवासात झालेलो आहे. त्यामुळे आमचा मुद्दा नाही, तर या इन्वेस्टिगेशनला समर्थन करणारे, पारदर्शक पद्धतीने तपास झाला पाहिजे यासाठी जे कोणी प्रयत्न करतायत त्यांची इच्छा एवढीच आहे की अजित दादांना न्याय मिळाला पाहिजे. आणि आमचं हेच मत आहे की या अधिवेशनामध्ये अनेक मुद्दे सामान्य लोकांचे सुद्धा आम्हाला मांडायचे होते, पण आम्ही आमच्या नेत्याला न्याय देता येत नसेल, आमच्या नेत्यासाठी जर आम्ही लढणार नसू, माझ्या काकासाठी मी लढणार नसेल तर मग सामान्य लोकांसाठी कधी लढणार?

त्यामुळे जेवढी काही ताकद आहे, जेवढी काही क्षमता आहे, जेवढी माहिती मी गोळा करू शकलो, जी लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकलो महाराष्ट्रामध्ये, तर आम्ही प्रयत्न करतच आहोत. पण दिल्लीमध्ये सुद्धा ओळख नसताना अनेक लोकांना जाऊन भेटून, त्यांच्याशी चर्चा करून हा मुद्दा कुठेतरी जिवंत राहिला पाहिजे, आमच्या दादांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. उद्या जर आम्हालाच प्रश्न पडला की आमच्याच नेत्याला, आमच्याच काकाला आम्हाला न्याय देता आला नाही, तर लोकांना महाराष्ट्राला आम्ही न्याय कधी देणार आहोत?

त्यामुळे जे जे काही आमच्या हातात होतं, जेवढी काय ताकद आमच्यामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत आम्ही हा लढा लढत आहोत. उद्या जाऊन या बाबतीत काय होतंय ते बघावं लागेल. सत्तेत असल्यामुळे त्यांच्यापर्यंत हा मुद्दा जाईल नाही जाईल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण आपली जबाबदारी असते की लढणं, आम्ही ते लढत आहोत. आमच्याकडे पुरावे आहेत. फक्त काही लोक प्रेस कॉन्फरन्स घेतायत का नाही घेत, अजून काही माहिती काही लोकांपर्यंत आलेली आहे, त्यामुळे ते त्या बाबतीत काय करतात हे आपल्याला बघावं लागेल.

जय पवार पण एक प्रेस कॉन्फरन्स घेणार होता, तो बिचारा त्याच्या लेव्हलवर लढतोय. त्याची प्रेस कॉन्फरन्स कधी होते हे आपल्याला बघावं लागेल. आणि हे सगळं झाल्यानंतर एक शेवटची आणि मोठी प्रेस कॉन्फरन्स मी त्या ठिकाणी घेईल आणि बरेच पुरावे जे आमच्यापर्यंत आलेले ते लोकांसमोर आपल्या माध्यमातून आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही असेही रोहित पवार यांनी यावेळी नमूद केले.