सामुहिक शक्तीच्या जोरावर ‘करोना’ला निश्चित हरवू, अजित पवारांनी व्यक्त केला ठाम विश्वास

367

पिंपरी-चिंचवड शहरच नव्हे तर संपूर्ण राज्य ‘करोना’ विरोधात लढाई लढत आहे. या लढाईला जनतेचाही मोठा पाठिंबा मिळत असून सामुहिक शक्तीच्या जोरावर करोनाला आपण निश्चितच हरवू, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या वॉर रुमला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत वॉर रूमच्या कार्यप्रणालीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर त्यांनी शहरातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला.

कोणाला काय वाटते, याची फिकीर करण्याची गरज नाही!
कोरोनामध्ये राजकारण आणण्याचे कारण नाही. कोणाला काय वाटते, याची फिकीर करण्याची गरज नाही, असे अजित पवार यांनी म्हटलेया संकटातून जनता बाहेर कशी पडेल. सुरक्षित कशी राहील. याला आमचा अग्रक्रम असून ते काम मनापासून चालू आहे, असेही ते म्हणाले. अजित पवार यांना पत्रकारांनी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये संघर्ष आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की केंद्राने असे केले, राज्याने तसे केले, महापालिकेने असे केले, जिल्हा परिषदेने तसे केले असं म्हणत एकमेकांच्यावर ढकलाढकली करण्यापेक्षा देशातील जनता एकसंघ होऊन संकटाशी सामना करत आहे अशा प्रकारचे चित्र समाजामध्ये जाण्याची गरज आहे असे म्हटले. आम्ही आमच्या परीने परराज्यातील मजूरांसाठी जेवढ्या काही ट्रेन मागवून घेता येतील तेवढ्या घेण्याचा प्रयत्न केला आहे. आजही त्याचे काम सुरु आहे. कोणीही त्यांचा गावी चालत जाऊ नये असे पवार म्हणाले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनामुळे घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. स्वत: काळजी घेतल्यास तसेच स्वच्छता राखून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीचे पालन केल्यास आपण करोनावर मात करू शकतो. ही परिस्थिती राजकारण करण्याची नाही. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देण्याची ही वेळ आहे. परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यातील उद्योग सुरु करायला परवानगी दिली आहे. मात्र कामगार परराज्यात निघून गेल्यामुळे काही अडचणी येत आहेत. वेळ लागेल मात्र परिस्थिती निश्चितच पूर्वपदावर येईल. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता पोलीस, डॉक्टर, नर्स, आरोग्य विभागातील कर्मचारी करोनामुक्तीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे अजित पवार म्हणाले.
या लढ्यात सर्वांचा पाठींबा आणि साथ आजपर्यंत मिळाली आहे, यापुढेही कायम ठेवल्यास करोनावर निश्चितच विजय मिळवू असेही पवार म्हणाले.

इंडस्ट्रीच्या अडचणी सोडविणार…
पिंपरी-चिंचवड शहरातील कंपन्यांमधून पुण्यातील अनेकजण कामास आहेत. मात्र पुण्यातून पिंपरी-चिंचवडमध्ये येण्यास त्यांना अडचण येत आहे. त्याबाबत शासकीय पातळीवर काही मार्ग काढता येतो का? याबाबत प्रयत्न करणार असून इतरही जे काही औद्योगिक वसाहतीमधील कंपनीचालक व कामगारांचे समोर येत आहेत त्यावरही तात्काळ मार्ग काढला जाईल असे अजित पवार म्हणाले.

हॉटेल प्रश्नाबाबत मुंबईत बैठक…
पिंपरी-चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीत आल्याचा मुद्दा माजी नगरसेवक जगदीश शेट्टी यांनी अजित पवारांच्या निदर्शनास आणून दिला. यावर मुंबईत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्यात येणार आहे. याबाबत हॉटेल असोसिएशनच्या शिष्टमंडळाला मंगळवारी किंवा बुधवारी मुंबईत बैठकीसाठी बोलविण्यात आले असून यावेळी हॉटेल संदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या