
महायुती मोठे बहुमत मिळवून सत्तेवर आली. मात्र मंत्रिपदावरून धुसफूस सुरूच आहे. हायप्रोफाईल मंत्रिपदे आपल्याला मिळावीत यासाठी भारतीय जनता पक्षासह मिंधे गट आणि अजित पवार गटात ‘दम लगाके हयशा’ सुरू आहे. सर्वाधिक जागा मिळवणारी भाजपा मिंध्यांना आणि दादा गटाला क्रीम खाती देण्यास तयार नाही. किंबहुना मिंध्यांकडची क्रीम खाती स्वतःकडे खेचू पाहत आहे. मिंधे गट आणि अजित पवार गट आपली खाती सोडण्यास तयार नसल्याने अखेर आज दिल्ली गाठण्याची वेळ महायुतीवर आली.
मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. आता मंत्रिमंडळाच्या विस्ताराची गडबड सुरू असून 14 डिसेंबरला विस्तार होण्याची शक्यता आहे. त्या दिशेने हालचालीही सुरू झाल्या आहेत. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी ठाणे येथे जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. भाजपाश्रेष्ठी काही महत्त्वाची मंत्रिपदे मिंधे गटाला देण्यास तयार नाही, हा संदेश घेऊन बावनकुळे शिंदे यांच्याकडे गेल्याची माहिती आहे.
विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपा गृह आणि अर्थ खात्यासह अन्य महत्त्वाची खाती स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नात आहे. मिंधे गट आणि अजितदादांना लो-प्रोफाईल खाती देण्याकडे त्यांचा कल आहे. कारण या दोन्ही गटांचे आमदार हे भाजपच्या ईव्हीएम किमयेमुळे निवडून आले आहेत. त्या ऋणाखाली हे दोन्ही गट भाजपाविरुद्ध काही बोलू शकत नाहीत. मात्र चांगली खाती आपल्या गटाला मिळावीत यासाठी शिंदे आणि अजितदादांच्या गटामध्ये खेचाखेची सुरू झाली आहे. त्यात मिंधे गटाची दमछाक झाली आहे.
43 मंत्र्यांचे मंत्रिमंडळ, पण सध्या नेमकेच भरणार
महायुती सरकारचे मंत्रिमंडळ 43 जणांचे असणार आहे. पण सध्या नेमक्याच मंत्र्यांचे शपथविधी आटोपून घेऊया आणि हिवाळी अधिवेशनानंतर अन्य मंत्र्यांचा शपथविधी होऊ द्या असा भाजपाचा आग्रह आहे. अजित पवारांचा त्याला पाठिंबा आहे परंतु मिंधे गटाला मात्र एकाच वेळी सर्व मंत्र्यांचा शपथविधी उरकायचा आहे. मिंधे गट अजूनही गृह खात्यासाठी आग्रही आहे असे त्यांचे आमदार जाहीरपणे सांगत आहेत.
कोणत्या खात्यांवर भाजपचा डोळा
गृह, अर्थ, महसूल, सार्वजनिक बांधकाम, कृषी, सहकार, शिक्षण, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास व जलसंपदा.
मिंध्यांचे ‘उद्योग’ दादा गट पळवणार
गुजरातने महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवले तसे मिंधे गटाकडे असलेले उद्योग खाते आता अजित पवार गट पळवणार आहे. त्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. बुधवारी अजित पवार यांनी उद्योग खात्याचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांना बोलवून बैठक घेतली होती. त्या बैठकीत त्यांनी उद्योग खात्यासंदर्भातील संपूर्ण माहिती घेतल्याचे समजते.
विस्ताराचा फॉर्म्युला ठरेना… फडणवीस–अजितदादा दिल्लीत
मंगळवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजता मेघदूत बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्यात खलबते झाली. शिंदे आणि अजितदादांना त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना दुखावणे महागात पडू शकते. दुसरीकडे भाजपवाले जास्तीत जास्त मंत्रिपदे घेण्याची तयारी करत आहेत. त्यावर तासभर चर्चेनंतरही काहीच निर्णय न झाल्याने दिल्लीमध्ये जाऊन पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याचे या तिन्ही नेत्यांनी ठरवले होते. परंतु आज शिंदे दिल्लीला गेलेच नाहीत. फक्त फडणवीस आणि अजितदादांनी दिल्ली गाठून शहा यांची भेट घेतली.