बनावट कागदपत्रे सादर करणे भोवले, अजित पवार गटाच्या दीपक मानकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट कागदपत्रे सादर करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. बलात्कारातील आरोपी शंतनू कुकडेसोबतचे असलेले कोटय़वधींचे आर्थिक व्यवहार लपविण्यासह पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मानकरविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रौनक जैन (38), दीपक मानकर (67), शंतनू कुकडे (53) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विदेशी तरुणीला आश्रय देण्याच्या बहाण्याने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी शंतनू कुकडेसह आठजणांना पोलिसांनी अटक केली होती. कुकडेच्या बँक खात्यात तब्बल 100 कोटींचे व्यवहार झाले होते. त्याचा निकटवर्तीय रौनक जैन याच्या बँक खात्यातून मानकर पिता-पुत्रांच्या बँक खात्यात तब्बल पावणेदोन कोटी रुपये वर्ग झाले होते. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांनी मानकर यांची नुकतीच चौकशी केली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार स्वतŠ या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

पोलिसांचे आयकरसह ईडीला पत्र

आरोपी शंतनू कुकडे याच्या खात्यात तब्बल 100 कोटी रुपये आल्याचे पोलिसांना आढळले होते. चेन्नईतील कंपनी असून, त्या कंपनीचा कुकडे हा डायरेक्टर होता. संबंधित कंपनीच्या शेअरद्वारे हे पैसे खात्यात आल्याचे कुकडेने सांगितले आहे. त्याच्या खात्यातून 40 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची व्याप्ती मोठी असल्यामुळे पोलिसांनी आयकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालय (ईडी) यांना पत्र पाठविले आहे. त्यानुसार कुकडेच्या बँक खात्याचे फॉरेन्सिक ऑडिट केले जाणार आहे.