सूरज चव्हाण पोलिसांना शरण, जामिनावर सूटका

विधिमंडळात पत्ते कुटणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची मागणी करणाऱ्या छावा संघटनेचे विजयपुमार घाडगे यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून फरार झालेले अजित पवार गटाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण अचानक लातूर पोलिसांना रात्रीच्या अंधारात शरण आले. पोलिसांनी त्यांचा दीड तास पाहुणचार केला, त्यानंतर जामीन करून सन्मानाने सूरज चव्हाण यांना बंदोबस्तात घरी पाठवण्यात आले! त्यांच्यासोबत इतर दहा जणांनाही जामीन देण्यात आला.

अजित पवार गटाचे सूरज चव्हाण आणि त्यांच्या समर्थकांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल होताच सूरज चव्हाण, लाला सुरवसे, शुभम रेड्डी, अमित क्षीरसागर, ताज शेख, अभिजित सगळे पाटील, सिद्दीक मुल्ला, अहमद शेख, वसीम मुल्ला, रवि धुमाळ आणि राजू बरगे हे फरार झाले. पोलिसांनी या मारकुटय़ांच्या शोधासाठी तीन पथके रवाना केली. दोघांना अटकही करण्यात आली होती. बुधवारी पहाटे 4.30 वाजता सूरज चव्हाण हे आपल्या सहकाऱ्यांसोबत शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात शरण आले.