दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून शरद पवारांना वाढदिवसाची ‘भेट’ देण्याची अजित पवारांची होती इच्छा! पक्षाच्या नेत्यांची माहिती

ajit-pawar-and-sharad-pawar

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट पुन्हा एकत्र आणायचे होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त (१२ डिसेंबर) दोन्ही पक्ष एकत्र करून काकांना एक विशेष ‘भेट’ देण्याची त्यांची इच्छा होती, असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी केला आहे.

अजित पवार यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त करताना काकडे यांनी पडद्या मागील हालचालींची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘अजित दादांनी मला आणि विठ्ठलशेठ मणियार, श्रीनिवास पाटील यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना विनंती केली होती की, साहेबांशी (शरद पवार) चर्चा करून दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करा. १२ डिसेंबरला हे शक्य झाले नाही, तरी निवडणुकांनंतर आपण नक्की एकत्र येऊ, असा विश्वास दादांनी व्यक्त केला होता. मात्र, त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली’.

जयंत पाटील यांचाही दुजोरा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या संवादाला दुजोरा दिला आहे. पाटील यांनी सांगितले की, ‘१६ आणि १७ जानेवारी रोजी या संदर्भात उच्चस्तरीय बैठका झाल्या होत्या. १६ जानेवारीला दादा माझ्या घरी आले होते, तर १७ तारखेला त्यांनी गोविंद बागेत जाऊन पवार साहेबांची भेट घेतली होती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवून त्यानंतर विलीनीकरणाचा निर्णय घेण्याचे प्राथमिक पातळीवर ठरले होते’.

बारामती विमान अपघातात दुर्दैवी शेवट

बुधवारी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. खराब हवामानामुळे लँडिंगचा दुसरा प्रयत्न करत असताना विमान धावपट्टीपासून १०० मीटर अंतरावर कोसळले आणि त्याला आग लागली. या अपघातात दोन वैमानिक, एक सुरक्षा रक्षक आणि विमान परिचारिका यांचाही मृत्यू झाला.

अजित पवारांच्या पक्षाची धुरा आता कोणाकडे?

अजित पवार यांच्या पश्चात आता त्यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी पक्षाचे नेतृत्व करावे, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून होत आहे. तांत्रिक कारणांमुळे ते शक्य न झाल्यास प्रफुल्ल पटेल यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आपले सर्व मोठे निवडणूक प्रचार दौरे आणि रोड शो रद्द केले असून, केवळ घरोघरी जाऊन पत्रके वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

Ajit Pawar’s Last Wish: Reuniting Both NCP Factions as a Gift to Sharad Pawar

NCP leaders reveal that the late Ajit Pawar wanted to merge both NCP factions as a birthday gift for Sharad Pawar. Details emerge about secret meetings held in January before the tragic Baramati plane crash.