सूरज चव्हाण पदाचा राजीनामा द्या, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी अजित पवार यांचे आदेश

अजित पवार गटाचे नेते आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. याप्रकरणी अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना पदाचा राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

अजित पवार यांनी एक्सवर पोस्ट लिहून म्हटले आहे की, काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे असेही अजित पवार म्हणाले.

राज्याचे कृषीमंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे विधानपरिषदेत मोबाईलवर रमी खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. लातूरमध्ये अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकरे यांच्या टेबलवर पत्ते फेकून याबाबत जाब विचारला. तेव्हा सूरज चव्हाण यांच्यासोबत इतर कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केली. याप्रकरणी अजित पवार यांनी कारवाई करत सूरज चव्हाण यांची पदावरून उचलबांगडी केली आहे.