राज्याची तिजोरी ओसंडून वाहत नाही, अजितदादांनी करून दिली जाणीव

राज्याची तिजोरी ओसंडून वाहत नाही, असे एका प्रश्नावरील उत्तरात सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या नाजूक आर्थिक परिस्थितीची विधानसभेतील सर्व आमदारांना आज जाणीव करून दिली.

आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी भाकड जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्याबद्दल प्रश्न विचारला होता. यावेळी सदस्यांनी शेतकऱयांना भाकड जनावरांसाठी प्रति पशू 50 रुपये अनुदान देण्याच्या मागणीचा आग्रह धरला. यावेळी अजित पवार यांनी ही मागणी मान्य करणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात शेतकऱ्यांची संख्या जवळपास एक कोटी इतकी आहे. शेतकऱ्यांच्या गोठय़ात साधारणतः सरासरी 10 जनावरे असतात. त्यांना प्रत्येकी 50 रुपये याप्रमाणे दिवसाला 500 रुपये होतील. आपल्या राज्याचा अर्थसंकल्पही तेवढा नाही. ही योजना देशी गाईसाठी आहे. आपल्याकडे संकरित जनावरांची संख्यासुद्धा मोठी आहे. त्यामुळे अनुदान सुरू केल्यास आपली तिजोरी ओसंडून वाहते असा समज होईल, असे अजित पवार आपल्या शैलीत म्हणाले.