नीट काम करा नाहीतर तुमची जागा रोबो घेईल, अजितदादांनी कर्मचाऱ्यांना झापले

मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचाऱयांनी कामामध्ये तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करावा यासाठी ‘टेक वारी’ हा साप्ताहिक प्रशिक्षण कार्यक्रम आजपासून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी फीत कापण्यासाठी त्यांना चक्क एका रोबोने अचूकपणे ठरल्यावेळी कात्री आणून दिली. तो धागा पकडून अजितदादांनी यावेळी मंत्रालयातील कर्मचाऱयांना कानपिचक्या दिल्या. नेहमी कात्री शोधावी लागते, आज रोबोटने बरोबर कात्री आणून दिली, बघा किती बरोबर काम रोबोट करतोय ते, नीट काम करा नाहीतर भविष्यात तुमच्या जागी रोबो येईल, असे अजितदादा म्हणाले.

अजित पवार यांनी यावेळी कर्मचाऱयांना संबोधून भाषण करताना इतरही काही गोष्टींवरून चिमटे काढले. कर्मचाऱयांच्या वतीने त्यांना टॉवेलच्या आकाराएवढी शाल देण्यात आली होती. त्या शालीचा उल्लेख करत अजित पवार यांनी, टॉवेल आकाराची शाल दिली नसती तरी परवडले असते, किती काटकसर चालली आहे ते मी बघत होतो, आपलेच सरकार आहे, असे म्हणताच हशा पिकला.

– मंत्रिमंडळाच्या बैठकी वेळी अल्पोपहारात मिसळ देण्यात येते. त्याबद्दलही अजित पवार बोलले. कॅबिनेटला फक्त मिसळच दिली जाते. आता मी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना सांगणार आहे की, पुढच्यावेळी आहाराची जबाबदारी व्ही. राधा यांच्याकडे द्या, असे अजित पवार म्हणाले.