
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार अपघाताबाबत नागरी उड्डाण महासंचालनालयाने 22 पानी प्राथमिक तपास अहवाल आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या अपघाताच्या चौकशी अहवालावरून अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘एएआयबी’ने (AAIB) सादर केलेला प्राथमिक अहवाल हा अपूर्ण आणि वरवरचा असल्याची टीका करत त्यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (DGCA) कठोर कारवाईची मागणी केली आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर पोस्ट शेअर करत आपली भूमिका मांडली.
जय पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘एएआयबीने सादर केलेला प्राथमिक अहवाल मी वाचला असून, तो सखोलपणे तयार करण्यात आलेला नाही. हे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. ज्या कुटुंबांनी या अपघातात आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांना केवळ तांत्रिक किंवा औपचारिक माहिती नको आहे. महाराष्ट्रातील जनतेला आणि त्या पीडित कुटुंबांना सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळणे हा त्यांचा अधिकार आहे’.
विमान कंपनीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करताना जय पवार यांनी नमूद केले की, ‘DGCA’ ने ज्या त्रुटींच्या आधारे ‘व्हीएसआर व्हेंचर्स’ची काही विमाने जमिनीवर उतरवली आहेत, त्याच त्रुटी त्यांच्या इतर विमानांमध्येही असण्याची दाट शक्यता आहे. जर सुरक्षेशी संबंधित नियमांचे उल्लंघन आणि गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ ठराविक विमानांवर कारवाई करून चालणार नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जय पवार यांनी ‘डीजीसीए’ला थेट आवाहन केले आहे की, प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन व्हीएसआर व्हेंचर्सच्या संपूर्ण विमान ताफ्यावर कठोर निर्णय घेण्यात यावा. आवश्यक वाटल्यास या कंपनीचे संपूर्ण विमान संचालन तात्काळ बंद करण्याचा विचार प्रशासनाने करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अजित पवार यांचे विमान झाडाला धडकलं, 22 पानांचा प्राथमिक अहवाल आला समोर

























































