
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून महायुतीमधील मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी विरोधकांनी जोर लावून धरली आहे पण राजीनामा घेण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना पक्षाच्या कोअर समितीमध्ये स्थान देऊन अभय दिले आहे. दुसरीकडे नाराज असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनाही कोअर कमिटीमध्ये स्थान देऊन शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज सात प्रमुख नेत्यांची कोअर कमिटी जाहीर करण्यात आली. यात कोअर कमिटीत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडे यांचा समावेश केला आहे.
भुजबळांची नाराजी दूर होणार?
छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नसल्याने त्यांनी थेट पक्ष नेत्यांवर थेट हल्लाबोल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार, प्रफुल्ल पटेल व सुनील तटकरे हे तिघेच निर्णय घेतात. पक्षातील इतर लोकांना विश्वासात घेतले जात नाही. कसे आणि कोणत्या परिस्थितीत निर्णय घेतले जातात माहित नाही ते लादले जातात, अशी जहरी टीका छगन भुजबळ यांनी केली होती. त्यानंतर भुजबळ लवकरच राष्ट्रवादी सोडतील अशी चर्चा होती. पण आता त्यांना कोअर कमिटीत स्थान दिले आहे.
मंत्री पद कायम त्यात समितीची बक्षिशी
या समितीत मंत्री धनंजय मुंडे यांचाही समावेश करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या मुंडे यांच्यावर बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणासह विविध गैरव्यवहाराबाबत आरोप होत आहे. त्यामुळे मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेणार अशी चर्चा होती. पण राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी मुंडेंची पाठराखण केल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोप होऊ द्या पण जोपर्यंत मुंडे दोषी आढळत नाहीत तोपर्यंत राजीनामा नाही अशी भूमिका राष्ट्रवादीने घेतली आहे.. त्यामुळे मुंडेंचे मंत्रिपद कायम शाबूत तर राहिलेच पण आता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतील कोअर कमिटीत स्थान देऊन त्यांचे पक्षात स्थान अधिक बळकट केले आहे.