
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची तयारी सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा अॅक्शन मोडवर आले आहेत. आज नागपूर येथे अजित पवार गटाचे चिंतन शिबीर पार पडले. त्यात अजितदादांनी मंत्री आणि पालकमंत्र्यांचे कान टोचले. मंत्री इतर कामात व्यस्त राहणार असतील तर मंत्रीपद सोडावे लागेल आणि पालकमंत्र्यांना तीन दिवस मतदारसंघांमध्ये काढावेच लागतील, अशी कडक तंबी त्यांनी दिली.
नागपूरच्या एम्प्रेस सिटीमध्ये आयोजित या चिंतन शिबिराला अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अन्य मंत्री, खासदार, आमदार उपस्थित होते. प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाचे मंत्री पर्यटनाकरिता जिह्यात येतात असा जाहीर आरोप करत, त्यांचे पर्यटन बंद व्हायला पाहिजे याकडे आपल्या भाषणातून लक्ष वेधले. त्यानंतर मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी मंत्र्यांना दम दिला. निवडणुका येत-जात राहतील. जिंकणं-हरणं हा लोकशाहीचा भाग आहे, पण आपल्या मूल्यांसोबत तडजोड होऊ नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी पदाधिकाऱयांना केले.
हे चिंतन शिबीर केवळ पुढच्या निवडणुकीसाठी नाही. प्रत्येक नेत्याने आणि पदाधिकाऱयाने लोकांबरोबर संवाद ठेवला पाहिजे. कोणत्याही नागरिकाला असे वाटता कामा नये की नेते केवळ निवडणुकीच्या वेळीच दिसतात, अशा कानपिचक्याही अजित पवार यांनी पदाधिकाऱयांना दिल्या.