
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (दि. 30) याच ठिकाणी शेकडो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक अस्थी सावडण्याचा विधी शोकाकुल वातावरणात पार पडला. त्यानंतर कऱहा-निरा नदीच्या सोनगाव येथील संगमावर अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
या विधीप्रसंगी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार व जय पवार, तसेच श्रीनिवास पवार, रणजित पवार, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार यांच्यासह पवार कुटुंबीय आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. पार्थ व जय पवार यांनी विधीपूर्वक अस्थींचे संकलन केले. त्यानंतर सकाळी पार्थ आणि जय यांनी अस्थी विसर्जनाचा विधी पूर्ण केला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तर मनात अपार दुःख पाहायला मिळाले.
अस्थी सावडण्याचा धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर अजित पवार यांच्या अस्थींचे रक्षाविसर्जन करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार, जय पवार, ऋतुजा पवार, युगेंद्र पवार हे नावेतून संगमस्थळी जाऊन विधीत सहभागी झाले. बारामतीतील नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून आपली श्रद्धांजली अर्पण केली.
शरद पवार झाले भावुक
सावडण्याचा विधी सुरू असतानाच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मैदानावर आगमन केले. यावेळी पार्थ पवार यांनी ‘साहेब’ अशी हाक देत अजित पवार यांचा अस्थिकलश शरद पवार यांच्याजवळ आणला. हा क्षण अत्यंत हृदयद्रावक ठरला. शरद पवार भावुक झाल्याचे दिसून आले. त्यांनी अस्थिकलशाचे विधीपूर्वक पूजन केले.































































