महेश मांजरेकर, गजेंद्र अहिरे यांना कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, मुलुंड शाखेचा अकरावा वर्धापन दिन रविवार 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता मुलुंड पश्चिम येथील महाराष्ट्र सेवा संघ येथे संपन्न होणार आहे. या वेळी गेली अनेक वर्षे रंगभूमीवर विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱया ज्येष्ठ नाटककारांना ‘कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदा हा पुरस्कार अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे.

लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे व अभिनेत्री अंजली वळसंगकर यांना कमल शेडगे रंगकर्मी पुरस्कार तर बाल रंगकर्मी पुरस्कार भार्गव जगताप यांना जाहीर करण्यात आला आहे. यानिमित्ताने ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे व गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत ‘स्वरयात्री’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. धनंजय म्हसकर, अभिषेक नलावडे, केतकी चैतन्य, केतकी भावे-जोशी या नामवंत गायकांना नामवंत वादक साथसंगत करणार आहेत व अनघा मोडक यांच्या खुमासदार निवेदन शैलीत हा कार्यक्रम रंगणार आहे. शाखेचे सभासद, रसिकांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन प्रमुख कार्यवाह दिगंबर प्रभू यांनी केले आहे.