
अकोलेमध्ये पुन्हा एकदा धक्कादायक घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्यात अवघ्या पावणे तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या घटनेने अकोले शहरासह तालुका हादरून गेला आहे. गेल्या दोन आठवड्यातील ही तिसरी ते चौथी घटना आहे. वन विभागाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने नागरिकांनी वनविभागावर संताप व्यक्त केला आहे.
देवठाण गावातील हिवरगाव रोड लगत असलेल्या शेळके वस्ती नजिक राहणाऱ्या लहानू पोपट गांगड यांच्या पावने तीन वर्षीय कविता नावाच्या चिमुकलीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दूर्दवी घटना समोर आली आहे. नरभक्षक बिबट्यांनी परिसरात उच्छाद मांडला असून नागरिकावरील हल्ले तसेच या हल्ल्यात काहीजण मृत झाल्याने नरभक्षक बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा. नसबंदीचे काय झाले ? असे अनेक प्रश्न नागरिक करताना दिसून येत आहेत. देवठाण येथिल रहिवासी असणाऱ्या शेळके वस्ती जवळच ही घटना घडली. ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. तद्नंतर वनविभागाचे कर्मचारी आले. तब्बल 300 मीटर दूर अंतरावर छिन्नविछिन्न अवस्थेत छोट्या कविताचा मृतदेह ऊसाच्या फडात आढळून आला. याबाबत गांगड यांनी अकोले पोलिसात तक्रार दिली आहे. देवठाण ग्रामस्थांनी घटने बाबत संताप व्यक्त केला आहे.
काही दिवसापूर्वी देवठाण गावातील रामहरी काळे यांच्या वस्तीवर ही हल्ला केला होता. या हल्यात विठावाई रामहारी काळे यांचा मृत्यू झाला होता. 21 सप्टेंबरला पप्पू दुधवडे 22 वर्षीय मजुरी करणाऱ्या आदिवासी मुलाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तसेच बेलापूर बदगी गावात दिवसाढवळ्या शेतकरी मजुरांमध्ये दहशत पसरली आहे. आता शेतात जाणे मुश्किल झाले असून रात्री सुद्धा बिबट्या वस्तीत घरात इतरत्र भक्ष शोधण्यासाठी फिरताना आढळून येतात. बिबट्याच्या दहशतीने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. वारंवार होत असलेल्या हल्ल्यांमुळे अकोले तालुका भयभयीत झाला आहे. वनविभागाने तातडीने कारवाई करून नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली. कविताचे कोतुळ ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
वन विभागाचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेतत असल्याने नागरिकांनी वनविभागावर चांगले ताशेरे ओढले आहेत. वन विभागाचे अधिकारी फोन उचलत नाही. माहिती देत नाही..तसेच पिंजरे लावण्यास दिरंगाई करतात. पिंजऱ्यात कुत्रे, कोंबडी टाकल्याने बिबट्या पिंजऱ्याजवळ येत सुद्धा नाही. शेळीच्या आवाजाने बिबटे पिंजऱ्या मध्ये अडकण्याची शक्यता असते असे नागरिकांचे म्हणणे आहे.