न्यू हॉलीवूड – अमेरिकन लोकशाहीचा गोंधळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अक्षय शेलार

अमेरिकन समाज, राजकारण, लोकप्रिय संस्कृती आणि माध्यमांच्या बदलत्या नात्याचं सूक्ष्म निरीक्षण करीत अमेरिकन लोकशाहीचं एक गोंधळलेलं चित्र उभं करणारा हा चित्रपट.

रॉबर्ट ऑल्टमनचा `नॅशव्हिल’ (1975) हा न्यू हॉलीवूड काळातील सर्वाधिक गुंतागुंतीचा आणि व्यापक कॅनव्हास असलेला चित्रपट मानला जातो. वरकरणी हा कंट्री म्युझिकच्या बालेकिल्ल्यात घडणाऱया काही दिवसांच्या घटनांचा कोलाज आहे. मात्र, प्रत्यक्षात तो अमेरिकन समाज, राजकारण, लोकप्रिय संस्कृती आणि माध्यमांच्या बदलत्या नात्याचं सूक्ष्म निरीक्षण आहे. अनेक पात्रं, अनेक कथा आणि त्यांना जोडणारा संगीताचा सतत चालणारा प्रवाह या सर्वांच्या सहाय्याने ऑल्टमनने अमेरिकन लोकशाहीचं एक गोंधळलेलं चित्र उभं केलं.

न्यू हॉलीवूड चळवळीने दिग्दर्शकांना स्वातंत्र्य दिलं आणि ऑल्टमन हा त्या स्वातंत्र्याचा सर्वाधिक सर्जनशील वापर करणारा दिग्दर्शक ठरला. `नॅशव्हिल’मध्ये पारंपरिक कथानक जवळ जवळ नाहीच. त्याऐवजी इथे चोवीस प्रमुख पात्रं आहेत. त्यात गायक, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार, चाहत्यांचा जमाव आणि नुसतेच शहरात भटकणारे लोक आहेत. या सगळ्या व्यक्तिरेखांमधून चित्रपट एका समाजाचं मोझॅक तयार करतो. कोणतंही पात्र पूर्णपणे केंद्रस्थानी नाही. त्याऐवजी प्रत्येक जण एका मोठय़ा सांस्कृतिक गोंधळाचा भाग आहे.

ऑल्टमनच्या शैलीचं सर्वात मोठं वैशिष्टय़ म्हणजे त्याचं `ओव्हरलॅपिंग डायलॉग’. अनेक पात्रं एकाच वेळी बोलतात, आवाज एकमेकांत मिसळतात आणि प्रेक्षकाला त्या गोंधळातून अर्थ शोधावा लागतो. त्यामुळे चित्रपटात एक विलक्षण वास्तववाद येतो. आपण जणू एखाद्या शहराच्या गर्दीत उभे आहोत, जिथे प्रत्येक जण काहीतरी बोलतोय, गातोय, ओरडतोय; पण कुणाचंही पूर्ण वाक्य स्पष्ट ऐकू येत नाही.

संगीत हा या चित्रपटाचा कणा आहे. कंट्री साँग्जमधून पात्रांची मानसिकता, त्यांची स्वप्नं आणि त्यांच्या अपयशाची कहाणी उलगडते. ही गाणी केवळ मनोरंजनासाठी नाहीत. ती समाजाच्या भावविश्वाचा भाग आहेत. उदाहरणार्थ, बार्बरा जीनसारखी प्रसिद्ध गायिका मंचावर गाताना दिसते, पण त्यात जणू लोकप्रियतेचा भार तिच्या व्यक्तिमत्त्वाला झेपत नाही. दुसरीकडे, सामान्य लोक मंचावर येऊन गाणं म्हणण्याची स्वप्नं पाहतात. संगीत म्हणजे इथे यशाचं, ओळखीचं आणि अस्तित्त्वाचं माध्यम आहे.

`नॅशव्हिल’च्या राजकीय पार्श्वभूमीला विशेष महत्त्व आहे. 1970च्या दशकात अमेरिकेत वॉटरगेट स्पॅंडलनंतर राजकारणावरचा विश्वास डळमळीत झाला होता. चित्रपटात `हॅल फिलीप वॉकर’ नावाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या काल्पनिक उमेदवाराची प्रचार मोहीम सतत ऐकू येते, पण तो स्वत कधीच दिसत नाही. फक्त लाऊड स्पीकरवरून त्याचे संदेश ऐकू येतात. हा तपशील अमेरिकन राजकारणाच्या दूरस्थ आणि कृत्रिम स्वरूपाकडे निर्देश करतो. लोकशाहीचा आवाज जणू लाऊड स्पीकरच्या गोंगाटात हरवलेला आहे. ऑल्टमनने या चित्रपटात प्रसिद्धी आणि माध्यमांचे नातेही उलगडले आहे. कॅमेरे, रिपोर्टर्स आणि सतत चालणारी सार्वजनिक प्रदर्शनाची इच्छा या सगळ्यांमुळे व्यक्ती आणि प्रतिमा यांच्यातली सीमा अस्पष्ट होते. पात्रं सतत कुणाच्या तरी नजरेच्या टप्प्यात असतात. त्यामुळे त्यांचं `खरं’ अस्तित्व आणि सार्वजनिक व्यक्तिमत्त्व यात फरक राहत नाही.

चित्रपटाचा शेवट हा न्यू हॉलीवूडच्या शैलीला साजेसा धक्का देणारा आहे. एका राजकीय सभेदरम्यान अचानक गोळीबार होतो. हा हिंसाचार अनपेक्षित आहे, पण त्या काळाच्या सामाजिक वातावरणाशी सुसंगत आहे. मात्र, त्या क्षणानंतरही कार्पाम थांबत नाही. लोक पुन्हा गाणं सुरू करतात. `इट वोन्ट वरी मी’ हे गाणं सगळे मिळून गातात. जणू समाजाला हादरवणाऱया घटनेलाही मनोरंजनाच्या आवरणात झाकून टाकण्याची अमेरिकन प्रवृत्ती इथे दिसते. या शेवटामुळे `नॅशव्हिल’ केवळ संगीतपट न राहता तो एक राजकीय विधान बनतो. लोकशाही, पॉप कल्चर आणि माध्यमं यांच्या संगमात व्यक्तीची संवेदना कशी हरवते? हा प्रश्न चित्रपट विचारतो.

न्यू हॉलीवूडच्या संदर्भात `नॅशव्हिल’चं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या चळवळीने दिग्दर्शकांना मोठय़ा स्टुडिओंपासून काही प्रमाणात स्वातंत्र्य दिलं आणि त्यातून अशा प्रयोगशील चित्रपटांची निर्मिती शक्य झाली. अनेक पात्रं, विखुरलेलं कथानक, राजकीय मुद्दे हे सर्व त्या काळातील सिनेमाच्या बदलत्या भाषेचं प्रतीक आहेत.

आजच्या काळात `नॅशव्हिल’कडे पाहिलं तर तो अधिकच सुसंगत वाटतो. मनोरंजन आणि राजकारण यांच्यातील सीमा आज जवळ जवळ नाहीशा झाल्या आहेत. सोशल मीडियाच्या युगात प्रत्येक जण जणू एका सतत चालणाऱया मंचावर उभा आहे. ऑल्टमनने 1975मध्ये जे चित्र उभं केलं, ते आजच्या सार्वजनिक संस्कृतीत अधिक स्पष्ट दिसतं. एका देशाचा विखुरलेला, विस्कळीत, पण तरीही एकत्र गाण्याचा प्रयत्न करणारा आवाज दिसतो. आज अमेरिकेला अशाच दृष्टीची तर गरज आहे ना?
(लेखक चित्रपट समीक्षक आहेत.)
[email protected]