आळंदी नगरसेवक खूनप्रकरण, दोन अल्पवयीन मुलांसह चार जेरबंद

67

सामना प्रतिनिधी । पिंपरी

आळंदी नगरपरिषदेतील भाजप नगरसेकक बालाजी कांबळे यांचा खुनप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांसह चारजणांना दिघी पोलिसांनी जेरबंद केले. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी सकाळी साडेअकराच्या सुमारास कांबळे यांचा मृतदेह दिघी पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला. पोलिसांनी चारजणांना ताब्यात घेतल्याचे सांगितल्यावर मृतदेह हलविण्यात आला. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास आळंदी स्मशानभूमीत कांबळेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

संतोष माने आणि प्रफुल्ल गबाले (रा. आळंदी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन असून, तो १७ वर्षांचा आहे. बालाजी सुधाकर कांबळे (कय ३३, रा. देहूफाटा, आळंदी देवाची) असे खून झालेल्या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. कांबळे यांचा मावस भाऊ कृष्णा राजकुमार घोलप (वय २४, रा. काळेवाडी झोपडपट्टी, देहूफाटा) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिघी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी याबाबत माहिती दिली. मंगळवारी (दि. २७) सायंकाळी कांबळे पुणे-आळंदी रस्त्याने आळंदीकडे जात असताना कर कडमुखवाडीजवळील साई मंदिराजवळ मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर कोयत्याने सहा वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने कांबळे यांचा मृत्यू झाला.

दोन महिन्यांपूर्वी काळेवाडी झोपडपट्टीमध्ये एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी कांबळे गेले होते. त्या कार्यक्रमात त्यांचा एका अल्पवयीन मुलासमवेत वाद झाला होता. या भांडणानंतर अल्पवयीन मुलाने कांबळे यांना वारंवार मारण्याची धमकीदेखील दिली होती. त्यामुळे त्यानेच कांबळे यांचा खून केल्याचा संशय घोलप यांनी फिर्यादीत व्यक्त केला. त्यानुसार, दिघी पोलिसांनी आरोपींना जेरबंद केले.

आपली प्रतिक्रिया द्या