
मुंबई, पुणे आणि ठाणेकरांचे पहिल्या पसंतीचे पर्यटन डेस्टिनेशन असलेल्या अलिबागला येण्यासाठी पर्यटकांना कंबरतोड प्रवास करावा लागत आहे. अलिबाग ते वडखळ मार्गावर जागोजागी एक ते दीड फुटाचे खड्डे पडल्यामुळे गचके बसून प्रवाशांच्या मणक्याला दणके बसत आहेत. राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे ही परिस्थिती ओढवली असून एखादा जीवघेणा अपघात झाल्यानंतरच अधिकाऱ्यांना जाग येणार काय, असा संतप्त सवाल पर्यटकांतून व्यक्त होत आहे.
अलिबाग हे मुंबईच्या जवळचे पर्यटनस्थळ आहे. एका दिवसाची सहल करता येत असल्याने मुंबई, ठाणे, पुण्यातून असंख्य पर्यटक अलिबा-गला जात-येत असतात. सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार व रविवार पर्यटकांच्या गाड्या सतत या मार्गावरून धावत असतात. वडखळजवळ जेएसडब्ल्यूचा महाकाय कारखाना असल्याने वडखळ ते जेएसडब्ल्यू गीतानगर येथेही गाड्या-‘ची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अलिबाग वडखळ मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याचे पाप उघडे पडले
सार्वजनिक बांधकाम खात्याचा कडाडून निषेध करत काही दिवसांपूर्वी सामाजिक संस्था व स्थानिक तरुणांनी एकत्र येत खडी व मातीच्या सहाय्याने हे खड्डे बुजवले. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याला जाग आली आणि त्यांनी भरपावसात खड्ड्यांमध्ये बारीक खडी टाकली. मात्र ही तात्पुरती डागडुजी असून नंतर पडलेल्या चार दिवसांच्या मुसळधार पावसाने खडी वाहून गेली. पुन्हा हे खड्डे उघडे पडले आहेत.
चौपदरीकरणाचा प्रस्ताव गुंडाळला
अलिबाग, पेण मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आला, त्यावर चर्चाही झाल्या. पण प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून हा चौपदरीकरणाचा प्रस्ताव गुंडाळण्यात आला. त्याचे दुष्परिणाम मात्र स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांना भोगावे लागत आहेत.
गणरायाला घरी आणायचे कसे?
सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने पोयनाड, कार्लेखिंड, तळवली, वाडगाव, गोंधळपाडा, पिंपळवाट, बायपास रोड या मार्गावर जागोजागी तब्बल एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना ‘दणक्याची यात्रा’ करावी लागत आहे. खड्ड्यांमुळे गाड्यांचा वेग मंदावत असल्याने अनेकदा ट्रॅफिक कोंडीही होत आहे. काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. अलिबाग आणि परिसरातील ग्रामस्थ पेणमधून गणेशमूर्ती आणतात. अशा खड्डेमय रस्त्यातून गणरायाला घरी कसे आणायचे याची चिंता त्यांना भेडसावत आहे.