
हिंदुस्थानचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने आपला जबरदस्त फॉर्म राखत ऑल इंग्लंड बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुष एकेरीच्या उप-उपांत्यपूर्व लढतीत लक्ष्यने अँगस एनजी का लॉग याचा 21-19, 21-23, 21-10 असा पराभव केला. जगातील बाराव्या क्रमांकाचा खेळाडू असलेल्या लक्ष्यने तीन गेमपर्यंत रंगलेल्या या लढतीत पुनरागमन करत विजय मिळवला.
पहिल्या गेममध्ये लक्ष्य सुरुवातीला पिछाडीवर होता, मात्र त्याने आक्रमक खेळ आणि अचूक प्लेसमेंटच्या जोरावर आघाडी घेत गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये लोंगने जोरदार पुनरागमन करत सामना बरोबरीत आणला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये लक्ष्यने दमदार खेळ करत प्रतिस्पर्ध्यावर पूर्ण वर्चस्व गाजवले. उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यचा सामना आता चीनच्या ली शिफेंग किंवा आयर्लंडच्या न्हाट न्गुयेन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.





























































