‘जगन्नाथ पुरी’चे चारही दरवाजे उघडले
ओडिशा पुरी येथील जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे गुरुवारी भाविकांसाठी उघडण्यात आले. राज्याचे नवे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांच्या पहिल्याच पॅबिनेट बैठकीत जगन्नाथ मंदिराचे चारही दरवाजे उघडण्याचा प्रस्ताव ठेवला होता. हा प्रस्ताव मंजूर होऊन आज सकाळी सर्व दरवाजे उघडले. कोरोनाच्या काळात माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या सरकारने मंदिराचा घोडा दरवाजा (उत्तर दरवाजा), वाघ दरवाजा (पश्चिम दरवाजा) आणि हस्ती दरवाजा (दक्षिण दरवाजा) बंद करण्याचे आदेश दिले होते. भाविकांसाठी फक्त सिंह दरवाजा उघडा होता..
‘पुष्पा 2’ चा 15 ऑगस्टचा मुहूर्त हुकणार
अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा 2’ या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्पंठा आहे. मात्र त्यासाठी चाहत्यांना आणखी वाट पहावी लागेल असे दिसतेय. कारण अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा 2’ येत्या 15 ऑगस्टला प्रदर्शित होणार नसल्याचे समजते. चित्रपट अद्याप पूर्ण न झाल्याने प्रदर्शन पुन्हा पुढे ढकलण्यात येतंय. तसेच अल्लू अर्जुनची तब्ब्येत ठीक नसल्याने महिनाभर शूटिंग पुढे गेल्याचीही चर्चा आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चित्रपटाची टीम योग्य तो निर्णय घेत आहे. अद्याप यावर कोणताही ठाम निर्णय झालेला नाही.
‘बॉर्डर’चा सिक्वेल येतोय
देशभक्तीवर आधारित जे. पी. दत्ता यांचा ‘बॉर्डर’ हा चित्रपट आणि त्यातली गाणी आज 27 वर्षांनंतरही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. गेल्या काही दिवसांपासून ‘बॉर्डर’च्या सिक्वेलची चर्चा होती. अखेर आज अभिनेता सनी देओल याने टीझर शेअर करत ‘बॉर्डर 2’ची घोषणा केली. ‘बॉर्डर 2’ हा बॉलीवूडचा मोठा युद्धपट असणार आहे. टी सिरीज या चित्रपटाची निर्मिती करणार असून दिग्दर्शनाची धुरा अनुराग सिंह सांभाळणार आहे. सनी देओल यांच्यासह चित्रपटात कोणते कलाकार असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
‘हमारे बारह’च्या प्रदर्शनाला स्थगिती
‘हमारे बारा’ हा चित्रपट इस्लाम धर्माचा आणि विवाहित मुस्लिम महिलांचा अपमान करणारा असल्याच्या आरोपांची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. चित्रपटाचा ट्रेलरमध्ये सर्व आक्षेपार्ह संवाद होते, असे सुट्टीतील खंडपीठाने म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयातील याच संबंधातील याचिका निकाली निघेपर्यंत खंडपीठाने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती दिली. कर्नाटकात आधीच बंदी असलेला हा चित्रपट उद्या रिलीज होणार होता.
अॅपल सर्वात मौल्यवान कंपनी
मायक्रोसॉफ्टला मागे टाकत अॅपलने पुन्हा एकदा जगातील सर्वात मौल्यवान कंपनी होण्याचा मान पटकावला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सत्रात अॅपलचा शेअर 2 टक्क्यांनी वाढून 211.75 डॉलरवर पोहोचला. त्यानंतर अॅपलचे बाजार भांडवल 3.25 ट्रिलियन डॉलरवर पोहोचले. मायक्रोसॉफ्टचे बाजार भांडवल 3.24 ट्रिलियन डॉलरवर आले आहे. गेल्या पाच महिन्यांत अॅपलने मायक्रोसॉफ्टला मागे टाकण्याची ही पहिलीच वेळ आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, सॉफ्टवेअर अपग्रेडेशनसह त्याच्या उपकरणांमध्ये एआय फीचरमुळे, अॅपल आयपह्नच्या विक्रीत मोठी वाढ होऊ शकते.
गो फर्स्ट विमान कंपनीला पुन्हा मुदतवाढ
‘गो फर्स्ट’ला लवादाने दिवाळखोरी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी 60 दिवसांची मुदतवाढ दिली. ही कंपनी खरेदीदार शोधण्यासाठी प्रयत्नशील आहे.
नऊ तास हवेत उडाल्यावर विमानाचा यू टर्न
ब्रिटीश एअरवेजचे विमान सोमवारी लंडन येथून ह्यूस्टनला निघाले होते. विमानात 300 प्रवासी होते. नऊ तास विमानाने हवेत उड्डाण केले. त्यानंतर एकाएकी काय घडले ते समजलेच नाही. विमानाने यू टर्न घेतला आणि ते लंडनच्या विमानतळावर उतरले. या घटनेने सारे भयभीत झाले.