मुंबई जलमार्गावरील प्रवाशांच्या समस्या लवकरच सोडवा! ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनची मागणी

गेट वे मांडवा रेवस/मोरा तसेच करंजा – रेवस या सेवेने वर्षाला 35 ते 40 लाख प्रवासी प्रवास करतात. या मार्गावर प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी आग्रही मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनने केली.

ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल, सचिव विश्वास मोरे यांनी नुकतीच अतिरिक्त मुख्य सचिव (बंदरे व परिवहन) संजय सेठी यांची भेट घेतली. रेवस बंदरात मोठय़ा प्रमाणात गाळ साचतो. त्यामुळे अनेकदा लाँचेस बंदराला लागण्यापूर्वीच गाळात अडकतात. प्रवाशांना तासनतास भर समुद्रात ताटकळत रहावे लागते. बंदर उत्तरेला 200 मीटर वाढविल्यास लाँचेस गाळात अडकण्याचा प्रश्न सुटेल व गाळ काढण्यासाठी लागणारा करोडो रुपयांचा खर्च वाचेल. मात्र या जिव्हाळ्याच्या प्रश्नी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही, याकडे असोशिएशनने लक्ष वेधले.

ऑगस्ट 2019 पासून न्यू फेरी वार्फ ते मांडवा मार्गावर रो-रो सुरू झाली आहे. हा प्रकल्प सुरू व्हायच्या अगोदरच मांडवा येथील गाळ काढण्यासाठी करोडो रुपये खर्च झाले. अजूनही गाळ काढण्यासाठी मोठय़ा प्रमाणात खर्च होतोय. हा खर्च वाचविण्यासाठी शासनाने खडकवासला पुणे येथील पेंद्रिय जल व उर्जा संशोधन केंद्राचा सल्ला घ्यावा, अशी मागणी केली. या समस्या  सोडविण्यासाठी संजय सेठी यांनी संबंधितांना सूचना केल्या.

मुंबई – ठाणे, विरार, बदलापूर परिसरातून मोठय़ा प्रमाणात पर्यटक गेटवे – मांडवा जलमार्गे प्रवास करतात. याचा फायदा घेत या मार्गावर प्रवास करणाऱ्या जलवाहतूक संस्था मनमानी पद्धतीने भाडेवाढ करतात.  याकडे असोशिएशनने लक्ष वेधले.

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना नाही

गेट वे मांडवा, रेवस – मुंबई, मोरा – मुंबई जलमार्गावरील फेरी बोटी या 40-50 वर्षाहून जुन्या असल्यामुळे त्या भर समुद्रात वारंवार बंद पडतात. येथील फेरी बोटी छोटय़ा असून प्रवाशांची गर्दी जास्त असते. त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या सेवांचे सर्वेक्षण काटेकोरपणे होत नाही. योग्य सर्वेक्षणाबरोबर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक बाबींची व्यवस्था व्हावी असे असोशिएशनने म्हटले आहे.