
घरमालक आपल्या वैयक्तिक गरजांसाठी दुकान किंवा घर रिकामे करायला सांगत असेल, तर भाडेकरू घरमालकाच्या गरजांची सत्यता पडताळणी करू शकत नाही, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. केवळ घरमालकाला वापरासाठी जागेची आवश्यकता आहे हे सिद्ध करावे लागेल. मात्र घरमालकाने सांगितल्यावर भाडेकरूला घर सोडावेच लागेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने भाडेकरूची याचिका फेटाळली. मात्र त्याच वेळी भाडेकरूला जागा सोडण्यासाठी आठ महिन्यांची मुदत दिली.
कानपूर नगरच्या गांधीनगरमध्ये याचिकाकर्त्याने भाडय़ाने दुकान घेतलेले आहे. घरमालकाने खासगी व्यवसाय वाढवायचा आहे असे सांगून दुकान सोडण्याची नोटीस भाडेकरूला दिली. याचिकाकर्त्या भाडेकरूचे म्हणणे आहे की, घरमालकाकडे जागेचा दुसरा पर्याय आहे, तिथे तो गोदाम करू शकतो. दुकान रिकामे न करता घरमालकाची गरज पूर्ण होऊ शकते.



























































