
हैदराबाद येथे ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान बुधवारी थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 39 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूबद्दल अभिनेत्याने शोक व्यक्त करत तिच्या कुटुंबाला 25 लाख रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच या घटनेत गंभीर जखमी झालेला महिलेच्या मुलगा लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना यांची मुख्य भूमिका असलेला ‘पुष्पा 2: द रुल’ 5 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला. त्याआधी बुधवारी हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी अल्लू अर्जुनच्या चाहत्यांनी थिएटरबाहेर एकच गर्दी केली होती. गर्दीमुळे थिएटरबाहेर चेंगराचेंगरी झाली. यात 39 वर्षीय महिलेने आपला जीव गमावला. तर तिचा मुलगा यात गंभीर जखमी झाला. याबाबत अभिनेत्याने पीडित कुटुंबाबाबत संवेदना व्यक्त करत मदत जाहीर केली आहे.
व्हिडिओ प्रसिद्ध करून मदतीची घोषणा
अल्लू अर्जुनने ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत महिलेच्या मृत्यूबाबत शोक व्यक्त केला. अभिनेत्याने पोस्टमध्ये लिहिले की, “संध्या थिएटरमधील दुःखद घटनेने मला खूप दुःख झाले आहे. या अकल्पनीय कठीण काळात मी शोकाकुल कुटुंबाप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. या दुःखात ते एकटे नाहीत आणि मी वैयक्तिकरित्या कुटुंबाला भेटेन. पीडित कुटुंबाला या कठिण प्रसंगात शक्य ती सर्व मदत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे”, असे अल्लू अर्जुनने पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच पीडित कुटुंबाला 25 लाख रुपये मदत देण्याचे आश्वासनही अभिनेत्याने आपल्या पोस्टमधून दिले आहे.
‘पुष्पा 2: द रुल’ च्या प्रीमियर शोदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनसह इतरांविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. मृत महिलेच्या कुटुंबीयांनी अभिनेत्यासह त्याची सुरक्षा टीम आणि थिएटर व्यवस्थापनाविरुद्ध चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.