
उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून तापमान सुमारे 35 ते 38 अंशापर्यंत पोहचले आहे. त्याचा आंबा-काजूवर विपरीत परिणाम झाला आहे. फळगळती मोठय़ा प्रमाणात होत आहे. आंबा उत्पादन कमी असताना बागायतदारांना आणखी नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तापमान वाढीमुळे होणाऱया आर्थिक नुकसानीचे चटकेही बागायतदारांना सहन करावे लागणार आहेत.
परिसरातील बागांमध्ये फळगळती आणि आंबा फळ करपण्याचे प्रमाण वाढले आहे. तापमानवाढीने होणारी फळगळती रोखण्यासाठी झाडांना पाणी देण्यासारख्या उपाययोजना शेतकरी-बागायतदार करीत आहेत. मात्र, आधीच आंबा उत्पादन कमी त्यामध्ये वाढत्या तापमानामध्ये होणाऱया फळगळतीची भर अशा स्थितीमध्ये होणारे नुकसान रोखण्यासाठी किती दिवस आणि किती झाडांना असा पाणीपुरवठा करायचा, असा प्रश्न त्यांना सतावत आहे.
या साऱयामध्ये तापमानवाढीने होणारी फळगळती आणि फळ करपण्यातून सुमारे दहा ते पंधरा टक्के नुकसानीचा तडाखा बसण्याची शक्यता बागायतदारांकडून वर्तविली जात आहे. सकाळी थंडी आणि दुपारी कडक ऊन हा वातावरणातील बदलाचा फटका बागायतदारांना बसला आहे.
काजूचे उत्पादन शेवटच्या टप्प्यात आले आहे. सुरुवातीला काजू मोठय़ा प्रमाणात बाजारात उपलब्ध झाला. पहिल्या टप्प्यात 1200 रुपये किलोचा दर मिळाला, त्यानंतर आवक वाढताच काजूचा दर 800 ते 900 रुपये किलोपर्यंत आला. पुन्हा उष्णता वाढल्यामुळे शेवटच्या टप्प्यातील काजूची गळती सुरू आहे. त्यामुळे उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. भाव पुन्हा वाढून 1200 रुपयांवर गेला आहे. उत्पादन घटल्यामुळे सुकलेल्या काजूगरांच्या विक्रीलाही फटका बसणार आहे. बागायतदारांनाही सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
आंब्याचे 80 टक्के पीक वाया
‘यंदा आंब्याचे पीक दरवर्षीच्या तुलनेत फारच कमी आहे. तब्बल 80 टक्के पीक वाया गेले आहे. तापमानातील बदलामुळे आणि दव पडल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असे आंबा बागायतदार समीर पटवर्धन यांनी सांगितले. ‘मोहोर आल्यानंतर पीक मिळेल या आशेने लोकांनी फवारणी केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. करपा, फुलकिडे, अँथ्राग्नोज (पिळय़ारोग) असे रोग पडले. औषधांचाही त्याच्यावर परिणाम झालेला नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
वांझ मोहरामुळे रखडलेली फळधारणा
आंबा टिकविण्यासाठी बागायतदारांनी औषध फवारणीसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च केला आहे. कलमावर कुठे पैरी दिसायला लागली आणि उष्णतेच्या लाटेने फळगळती आणि फळ करपू लागले. आता फळगळती रोखण्यासाठी झाडांना पाणी देण्याच्या खर्चाची भर पडल्याने आंबा बागायतदारांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
प्रतिकूल वातावरणामुळे आम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. याचा सकारात्मक विचार होऊन शासनाने बागायतदारांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी.
राजेश शिंदे, आंबा बागायतदार, रत्नागिरी

























































