पोट फुगल्याने 10 दिवसांच्या बाळाला दिले गरम विळ्याचे चटके, अमरावतीतील संतापजनक प्रकार

पोटफुगी झाल्याने दहा दिवसांच्या बाळाला गरम विळ्याचे चटके दिल्याची घटना अमरावतीत उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. घटनेच्या 10 दिवसांनंतर हा प्रकार समोर आला. यानंतर चटके देणाऱ्या वृद्ध महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धा रोखण्यास प्रशासन कुचकामी ठरल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.

मेळघाटातील दहेंद्री गावात अंधश्रद्धेचा हा प्रकार घडला आहे. पोटफुगी किंवा पोटासंदर्भात विकार झाल्यास मुलांना डंबा देण्याचे म्हणजेच गरम विळ्याचे चटके देण्याचे प्रकार सुरू आहेत. याबाबत कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

घटना उघडकीस आल्यानंतर बाळाला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर बाळाची प्रकृती सुधारली असून त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.