
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची गर्लफ्रेंड, माजी टीव्ही पत्रकार लॉरेन सांचेझ हे दोघे शुक्रवारी लग्नबंधनात अडकले. जगभरातील मोठमोठ्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा इटलीतील व्हेनिस येथे थाटामाटात पार पडला. लॉरेन सांचेझ यांनी लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील 250 हून अधिक लोक उपस्थित होते. या लग्नासाठी 450 ते 500 कोटी रुपये खर्च आल्याचे सांगण्यात येत आहे. जेफ बेजोस यांचे वय 61 असून लॉरेन सांचेझ या 55 वर्षांच्या आहेत. हा विवाह सोहळा तीन दिवस चालला.
विवाहानंतरचा मुख्य स्वागत समारंभ आर्सेनाले येथे आयोजित करण्यात आला, जो मध्ययुगीन काळातील जहाजबांधणीचा एक ऐतिहासिक परिसर आहे. या विवाह सोहळ्यासाठी 90 हून अधिक खासगी विमाने, 30 वॉटर टॅक्सी बुक करण्यात आल्या होत्या. व्हेनिसमधील पंचतारांकित हॉटेल्समधील खोल्या या सोहळ्यासाठी आधीच बुक करण्यात आल्या होत्या.
विवाहाला कोण कोण उपस्थित?
हा विवाह सोहळा सॅन जियोर्जिया मॅगिओरच्या द्विपवर आयोजित करण्यात आला. पाहुण्यांना आणण्यासाठी खास बोटींची व्यवस्था करण्यात आली. या विवाह सोहळ्याला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प, तिचा पती जेरेड कुशनर, मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स, ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमॅन, हॉलीवूडमधील किम कार्दशियन, ख्लो कर्दशियन, केंडल जेन्नर, कायली जेन्नर, क्रिस जेन्नर, ओप्रा विन्फ्रे, टॉम ब्रॅडी, लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्यासह वेगवगेळ्या क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. व्हेनिसचे महापौर लुइगी ब्रुन्गारो यांनी या सोहळ्याचे स्वागत केले.