
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार गटाच्या घडामोडींवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे दोघेही महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखतात, असे सांगत दानवे यांनी त्यांच्यावर स्वार्थी राजकारणाचा आरोप केला.
दानवे म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांना दिल्ली आणि महाराष्ट्र—दोन्ही ठिकाणचं राजकारण अचूकपणे ठाऊक आहे. मात्र, हे दोन्ही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी आणि वैयक्तिक हितसंबंधांसाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय भूमिकेत जाण्यास तयार असतात, हे त्यांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे. सुनील तटकरे हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून प्रफुल्ल पटेल हे ज्येष्ठ नेते आहेत. दोघेही अत्यंत व्यावसायिक पद्धतीने राजकारण करणारे असल्यामुळे त्यांच्या हितसंबंधांचा माणूसच सत्तेच्या खुर्चीवर बसावा, अशीच त्यांची भूमिका असण्याची दाट शक्यता आहे, असा आरोप दानवे यांनी केला.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलताना दानवे म्हणाले की, “मी सुनेत्रा वहिनींबद्दल कोणतीही टीका करणार नाही. मात्र, अजित पवार यांनी निर्माण केलेल्या जागेवर त्यांचा नैतिक अधिकार आहे. शेवटी हा त्यांच्याच पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे.”
ते पुढे म्हणाले, “कोणताही पक्ष दुसऱ्या पक्षातील व्यक्तीला आपला अध्यक्ष बनवत नाही. शरद पवारांचा आणि त्यांचा पक्ष एकत्र येणार असता तर, ते काय सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवले असते का? त्यामुळे जो निर्णय झाला आहे, तो मान्य केला पाहिजे. त्यावर उगाच खल करण्यात काहीही अर्थ नाही,” असेही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.




























































