लाडका भाऊ योजना नवी नाही, तरुणांची मोठी फसवणूक; अंबादास दानवे यांची महायुती सरकारवर सडकून टीका

लाडकी बहीण योजनेवर तरुणांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर महायुती सरकारने आता लाडका भाऊ योजना आणली आहे. बेरोजगारांसाठी ही योजना आहे. आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लाडका भाऊ योजनेवरून महायुती सरकारवर सडकून टीका केली आहे. ही योजना म्हणजे तरुणांची फसवणूक आहे. ही 50 वर्षांपूर्वीची जुनी योजना असल्याचे अंबादास दानवे म्हणाले.

लाडका भाऊ योजना 1974 पासून सुरू आहे. ही नवी योजना नाही. जुनीच योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे पुन्हा राबवून सरकार तरुणांची मोठी फसवणूक करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे. मीडियाशी संवाद साधताना दानवे यांनी मिंधे सरकारचा समाचार घेतला.

लाडकी बहीण योजनेचे काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार

मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचे ऑनलाई फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या राज्यभर सुरू आहे. अंगणवाडी सेविकांवर लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याचे काम सोपवण्यात आले आहे. मात्र सोलापुरात अंगणवाडी सेविकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्यास नकार दिला आहे. ऑफलाईन फॉर्म स्वीकारून प्रकल्प कार्यालयात जमा करू. मात्र ऑनलाईन फॉर्म भरणार नाही, अशी स्पष्ट भूमिका महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेने घेतली आहे.

मानधनवाढीसाठी अंगणवाडी सेविकांनी सोलापूर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन केले. महाराष्ट्रातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणता मग अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का? असा सवालही अंगणवाडी सेविकांनी केला आहे.