किती दिवस देशातील हिंदूंना उल्लू बनवणार? अंबादास दानवे यांचा बावनकुळेंना टोला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ख्रिश्चन आणि मुस्लिम मतांच्या भरवशावर देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत आहेत असे वक्तव्य करणाऱया भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज चांगलाच समाचार घेतला. दानवे यांनी बावनकुळे व भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा दर्ग्यावर चादर चढवतानाचा पह्टो सोशल मीडियावर पोस्ट करत किती दिवस देशातील हिंदूंना उल्लू बनवणार, असा सवाल केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघात केला होता. तसेच आता तू तरी राहशील नाही तर मी तरी राहीन, असे उघड आव्हानच दिले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांच्यावर खोटय़ा केसेस टाकण्यासाठी फडणवीसांनी दबाव आणला होता. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर बावनकुळे यांनी त्यावर प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आहे असे म्हटले होते.

अंबादास दानवे यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटवर दोन पह्टो शेअर केले आहेत. त्यातील एका पह्टोमध्ये जे. पी. नड्डा आणि बावनकुळे हे चंद्रपूरमधील दर्ग्यात टोपी घालून चादर चढवताना दिसत आहेत. त्या पह्टोसंदर्भात लिहिताना दानवे यांनी नड्डा यांचा उल्लेख जनाब नड्डा असा केला आहे. दुसऱया पह्टोमध्ये कंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका चर्चमध्ये भेट देताना दिसत आहेत. चर्चच्या फादरकडून मोदींनी त्यावेळी येशू ख्रिस्ताची प्रतिमा असलेला क्रॉसही स्वीकारला होता.