मिंध्यांचे सूडबुद्धीचे राजकारण सुरूच आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अकोल्यातील शिवसेनेचे एकनिष्ठ आमदार नितीन देशमुख यांची पुन्हा एसीबीमार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे. विरोधकांना नाहक मनस्ताप देण्यासाठी ही खालची पातळी गाठल्याने मिंधेंविरुद्ध संताप व्यक्त होत आहे.
महायुती सरकारने आपली नीतिमत्ता अजून किती खाली न्यायची ठरवली आहे @Dev_Fadnavis? कारण चौकशीचा ससेमिरा लावताना तुम्ही आमदारांचे शाळकरी मुले देखील सोडत नाहीत. आपले आमदार पण कोणाचे तरी पिता आहेत हे ध्यानी ठेवा. दहावी आणि आठवीत शिकणाऱ्या मुलांचा शैक्षणिक खर्च विचारणारे हे पत्र आवर्जून… pic.twitter.com/raKkuDtLPW
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 19, 2024
मिंध्यांच्या या सूडबुद्धीच्या राजकारणावरून शिवसेना नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मिंध्यांना व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारत एक इशारा दिला आहे. ”महायुती सरकारने आपली नीतिमत्ता अजून किती खाली न्यायची ठरवली आहे? चौकशीचा ससेमिरा लावताना तुम्ही आमदारांचे शाळकरी मुले देखील सोडत नाहीत. आपले आमदार पण कोणाचे तरी पिता आहेत हे ध्यानी ठेवा. दहावी आणि आठवीत शिकणाऱ्या मुलांचा शैक्षणिक खर्च विचारणारे हे पत्र आवर्जून लक्षात ठेवले जाईल”, असा सूचक इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे.
नितीन देशमुख हे शिवसेनेचे एकनिष्ठ आमदार आहेत. गेल्यावर्षी 17 जानेवारीला त्यांना बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी अमरावतीच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. त्या चौकशीत एसीबीला काहीच सापडलेले नव्हते. तशा चौकशीचा मनस्ताप दिल्यानंतरही देशमुख डगमगले नव्हते. त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षावरील निष्ठा कायम ठेवली. याचदरम्यान निष्कारण चौकशीचा मनस्ताप देण्याच्या सूडाच्या राजकारणाचा मिंधेंना लोकसभा निवडणुकीत फटका बसला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर देशमुख यांच्यामागे पुन्हा एसीबी चौकशीचा ससेमिरा लावला आहे. अमरावती एसीबीने नितीन देशमुख यांची मुले शिक्षण घेत असलेल्या शाळेकडे देशमुख यांनी भरलेल्या फीबद्दल माहिती मागीतली आहे. सूडाच्या राजकारणासाठी मिंधेंनी चौकशीची ही खालची पातळी गाठल्याने सरकारविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.