‘द मुरुड फाईल्स’, मिंधे काँग्रेसच्या युतीवर अंबादास दानवे यांची टीका

शिवसेनेने काँग्रेससोबत युती करत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आरोप करत मिंधे गटाने भाजपसोबत हातमिळवणी केली होती. काँग्रेससोबत युती करण्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या या मिंध्यांनी आता सत्तेसाठी काँग्रेससमोर लोटांगण घातलं आहे. धारशिवच्या उमरगा येथे मिंधे गट व काँग्रेसने युती केल्यानंतर हे दोन्ही पक्ष आता रायगडमधील मुरुडमध्ये देखील एकत्र आले आहेत. तसे पोस्टर्सच सध्या मुरुड शहरात लागले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी मिंध गटावर सडकून टीका केली आहे.

अंबादास दानवे यांनी मुरुडमधील पोस्टर्सचा फोटो ट्विटरवर शेअर करत त्यासोबत एक पोस्ट लिहली आहे. ”धारशिवच्या उमरगा नंतर सादर आहे शिंदे-काँग्रेस युतीचे नवे पर्व, ‘द मुरुड फाईल्स’. शिंदेंची अंतुलेना साथ, बाण-पंजा एक साथ. यंदा ‘बाळासाहेबांचे विचार’ खुंटीऐवजी थेट समुद्रात का मग, एकनाथ शिंदेजी”, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.