
अंबरनाथच्या चिखलोली धरणात जांभिवली व ठाकूरपाडा परिसरातील रासायनिक कंपन्यांमधून दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पूर्वेतील सुमारे 50 हजार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून हे रासायनिक पाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी करण्यात आली आहे. या पाण्यामुळे धरणातील शेकडो मासेदेखील मृत झाले असून चिखलोली धरणाचे सुरक्षारक्षक नेमके करतात तरी काय, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.
चिखलोली धरण हे अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसीजवळ असून त्यातून हजारो नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. या धरणाच्या परिसरात रासायनिक कंपन्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्यातील अनेक कंपन्या बेकायदा असून या कंपन्यांचे रासायनिक पाणी थेट चिखलोली धरणात सोडले जाते. एवढेच नव्हे तर पाण्यामध्ये घाणेरड्या गोण्यादेखील फेकल्या जातात. रासायनिक पाण्याचा तवंग धरणातील पाण्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
पाण्याचे नमुने तपासणार
या घटनेची गंभीर दखल प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. पाण्याचे नमुने तपासण्यात येणार असून त्याचा अहवाल आल्यानंतर दोषी कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जयंत हजारे यांनी सांगितले.
‘त्या’ कंपन्यांना कायमचे टाळे ठोका
चिखलोली धरण हे महत्त्वाचे म्हणून समजले जाते. या धरणामध्ये रासायनिक पाणी सोडण्यात येत असेल तर संबंधित कंपन्यांना कायमचे टाळे ठोका. यासाठी आम्ही प्रदूषण नियंत्रण मंडळावर दबाव आणू, असे ‘आमा’ संघटनेचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी स्पष्ट केले.