अंबरनाथमध्ये मलंगगडावर दरड कोसळली, एकाचा मृत्यू

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडावर दरड कोसळली असून यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत या तरुणाची पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुलाम बादशाह सैय्यद असे त्या तरुणाचे नाव असून आपल्या एक वर्षाच्या बाळाला वाचविण्याच्या प्रयत्नात सैय्यद याचा मृत्यू झाला.

मलंगगड परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता. मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास डोंगरावरून मोठ मोठे दगड खाली कोसळायला लागले. या डोंगराखाली सैय्यद याचे घर होते. दगड कोसळल्याचे आवाज होताच. सैय्यद व त्याची पत्नी समीरा तेथून पळून जाऊ लागले. मात्र त्यांच्या आपल्या मुलाला उचलत असतानाच एक मोठा दगड त्यांच्या घरावर पडला. यावेळी सैय्यद यांनी मुलाला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सैय्यद व समीरा दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तत्काळ गावकऱ्यांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी गुलाम सैय्यदला मृत घोषीत केले तर समीराची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

ब्लास्टिंगमुळे दरड कोसळली

जेएनपीटी-वडोदरा महामार्गाच्या बोगद्याच्या कामासाठी एक मोठा स्फोट करण्यात आला होता. त्या स्फोटामुळे डोंगराला हादरे बसले. त्यामुळेच सोमवारी गुलाम यांच्या घरावर दरड कोसळली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.