बिस्कीटाच्या मशीनमध्ये अडकून 3 वर्षीय मुलाचा मृत्यू; अंबरनाथमधील काळीज पिळवटून टाकणारी घटना

अंबरनाथमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आईसोबत बिस्कीटाच्या कारखान्यामध्ये गेलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा मशीनमध्ये अडकून मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरू केला.

मिळालेल्या माहितीनुसार, आयुष चौहान असे मृत मुलाचे नाव असून तो आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मुलाची आई बिस्कीटाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना डबे पोहोचवण्याचे काम करते. ती मुळची बिहारची असून काही महिन्यांपूर्वी अंबरनाथमधील ठाकूरपाडा येथे रहायला आली होती.

तीन सप्टेंबरला सकाळी साडे आठच्या मुलाला घेऊन आनंद नगर एमआयडीसीतील चिखलोली प्लॉट नंबर 40, 41 वरील राधे कृष्णा बिस्कीट कंपनीमध्ये पोहोचली. घरी मुलाला सांभाळायला कुणी नसल्याने आई मुलाला घेऊन कंपनीमध्ये आली आणि कर्मचाऱ्यांना डबे देण्याचे काम करू लागली. यावेळी मशीनमधून बाहेर पडणारी बिस्कीटं पाहून आयुषच्या मनात कुतूहल निर्माण झाले आणि तो मशीनजवळ गेला.

बिस्कीट उचलण्यासाठी वाकताच मशीनचा पट्टा त्याच्या गळ्यात अडकला आणि तो ओढला गेला. काही क्षणात तो मशीनमध्ये अडकला. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात येतात त्यांनी धावतपळत मशीन बंद केले आणि मुलाला घेऊन जवळचे रुग्णालय गाठले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच मुलाला मृत घोषित केले.