द.आफ्रिका नॉनस्टॉप, अमेरिकेचा 18 धावांनी पराभव

नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याच्या निर्णयाने अमेरिकेचा घात केला. क्विंटन डिकॉकच्या तडाखेबंद 74 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने अमेरिकेच्या अननुभवी फलंदाजांसमोर 195 धावांचे ठेवलेले जबरदस्त आव्हान पेलले नाही. आंद्रिस गोसच्या 80 धावांच्या झुंजार खेळीनंतरही अमेरिका 176 धावांपर्यंतच पोहोचू शकली आणि दक्षिण आफ्रिकेने आपल्या नॉनस्टॉप विजयाची मालिका कायम राखत सलग पाचवा विजय नोंदविला.

अमेरिकेचा संघर्षपूर्ण पाठलाग

कगिसो रबाडा आणि आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत अमेरिकेच्या अर्ध्या संघाला 11.1 षटकांतच 76 धावांतच गारद केले होते. तेव्हा आंद्रिस गोस आणि हरमीत सिंह (38) यांनी आफ्रिकन मारा पह्डून काढत 42 चेंडूंत 91 धावांची भागी रचत अमेरिकेला विजयासमीप आणले. शेवटच्या दोन षटकांत 27 धावांची गरज असताना ही जोडी रबाडाने पह्डली आणि सामन्याला कलाटणी दिली. त्यानंतर आलेल्या जसदीपने 6 चेंडू वाया घालवत सामनाही गमावला. 5 षटकार आणि 5 चौकार ठोकणार्या गोसने 47 चेंडूत 80 धावा ठोकल्या. पण त्यांचा संघर्ष थोडक्यात कमी पडला.

डिकॉकची पहिली खणखणीत नॉक

गेल्या चारही सामन्यात 20, 0, 18, 10 अशा खेळ्या करणाऱया क्विंटन डिकॉकच्या बॅटमधून पहिली तूफानी खेळी निघाली. सौरभ नेत्रावळकरने रिझा हेंड्रिक्सला बाद करून अमेरिकेला पहिले यश मिळवून दिले. पण त्यानंतर एडन मार्करम आणि डिकॉकने अमेरिकन गोलंदाजीची पिसे काढताना 110 धावांची भागी रचून आफ्रिकेच्या द्विशतकी धावसंख्येचा पाया रचला. डिकॉकने 40 चेंडूंत 7 चौकार आणि 5 षटकार खेचत 74 धावा काढल्या. त्यानंतर मार्करम (46) आणि हेन्रिक क्लासन (ना.36) व ट्रिस्टन स्टब्ज (ना.20) यांनी 5 षटकांत 53 धावांची नाबाद भागी रचत संघाला 194 धावांपर्यंत नेले.