अमेरिकेतील वर्ल्ड आयोजनातील त्रुटी आता चव्हाटय़ावर येऊ लागल्यात. श्रीलंकन संघाने आपल्याला झालेल्या त्रासाची आयसीसीकडे तक्रार केल्यानंतरही या संघाला दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. मात्र पाकिस्तानी संघाने आवाज उठवताच आयसीसी खडबडून जागी झाली असून त्यांनी स्टेडियमपासून दीड तासावर असलेले हॉटेल बदलून ते पाच मिनिटावर असलेले हॉटेल बुक केले आहे.
क्रिकेटची लोकप्रियता अमेरिकेतही वाढावी म्हणून आयसीसीने गेल्या वर्षी त्यांनी टी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद दिले होते. तेव्हा या आयोजनाबाबत अनेकांच्या मनात साशंकता निर्माण झाली होती. अमेरिकेने युद्धपातळीवर स्टेडियमची निर्मिती केली आणि तयार खेळपट्टय़ाही बनवून अमेरिकेत आणल्या. स्पर्धेच्या आयोजनाची तयारी केली. पण वर्ल्ड कपच्या कार्यक्रमाची तयारी कशी करायची याचा अनुभव नसतानाही त्यांनी हे शिवधन्ष्यु पेलण्याचा प्रयत्न केला; पण त्यात ते अनेक ठिकाणी चुकले आहेत. अनेक संघ आपले साखळी सामने एक आणि दोन मैदानात खेळत असताना श्रीलंकेसाठी अमेरिका दर्शनाची व्यवस्था करताना त्यांना प्रत्येक सामन्याला प्रवास करायला भाग पाडले आहे. एवढेच नव्हे तर, त्यांचे स्टेडियमही हॉटेलपासून दोन तासांवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यांना खूप त्रासही सहन करावा लागत आहे. याबाबत त्यांनी आयसीसीकडे तक्रारसुद्धा केली, पण त्यांना आयसीसीकडून काहीही उत्तर मिळालेले नाही. मात्र पाकिस्तानी टीमचे हॉटेल स्टेडियमपासून दीड तासावर असल्याचे कळताच पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी आयसीसीकडे तक्रार करताच त्यांचे दीड तास दूर असलेले न्यूयॉर्कमधील हॉटेल चक्क पाच मिनिटांवर आणले आहे. पाकिस्तानचा संघ 9 तारखेला हिंदुस्थानविरुद्ध, तर 11 जूनला पॅनडाविरुद्ध खेळणार आहे. हिंदुस्थानी संघही न्यूयॉर्कमध्ये तीन साखळी सामने खेळणार असून त्यांचे हॉटेल दहा मिनिटांवर आहे. हिंदुस्थानी संघाच्या हॉटेलबद्दल माहिती मिळताच पाकिस्ताननेही आपल्या हॉटेल बदलाची मागणी आयसीसीकडे केली होती. अशीच चिंता श्रीलंकन मंडळानेही व्यक्त केली असून आयसीसीकडून त्यांना कोणतेही उत्तर मिळालेले नाही.