अमेरिकन बॉर्बन व्हिस्की हिंदुस्थानात अर्ध्या किमतीत, मोदी सरकारकडून आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी

अमेरिकन बॉर्बन व्हिस्कीवरील आयात शुल्क 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. त्यामुळे हिंदुस्थानात आता बॉर्बन व्हिस्की अर्ध्या किमतीत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिकन दौरा केला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला गेला आहे. बॉर्बन व्हिस्की हिंदुस्थानात निर्यात करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका प्रमुख देश आहे. हिंदुस्थानात येणाऱ्या एकूण दारूपैकी एक चतुर्थांश दारू ही अमेरिकेतून निर्यात केली जाते. अमेरिकेमध्ये बॉर्बन काऊंटी नावाचे एक राज्य आहे. या ठिकाणी सर्वात आधी व्हिस्की तयार करण्यात आली होती. या जागेवरून या व्हिस्कीचे नाव बॉर्बन व्हिस्की पडल्याची रंजक कथा आहे.

शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष

देशात शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. त्यांच्या मागणीकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे. बी-बियाणे, फवारणीसाठी लागणारी औषधे, खतांचा भाव कमी करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जाते. परंतु केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. व्हिस्कीवरील आयात शुल्क मात्र एका झटक्यात 50 टक्क्यांनी कमी केल्याने हे सरकार उद्योगपतीधार्जिणे आहे, अशी टीका पुन्हा एकदा होत आहे.