मुंबईत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू, एकनाथ शिंदे साताऱ्यात तर अजित पवार पुण्यात

मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आझाद मैदानात आंदोलन सुरू केले आहे. या मुळे संपूर्ण महाराष्ट्र तापला असताना दोन्ही उपमुख्यमंत्री मुंबईतून बाहेर गेले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यात आपल्या गावी गेले असून अजित पवार हे पुण्यात गेले आहेत.

हिंदुस्थान टाईम्सने याबाबत वृत्त दिले आहे. ज्या दिवशी जरांगे-पाटील मुंबईत पोहोचले आणि त्यांनी उपोषण सुरू केले, त्या दिवसापासून फडणवीस यांनी त्यांच्याशी थेट संवाद साधणे टाळले आहे. सरकारकडून कोणताही मंत्री त्यांना भेटण्यासाठी गेला नाही. वरिष्ठ भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीला आधी बैठक घेण्याचे आणि त्यानंतर मराठा आंदोलनकर्त्याशी चर्चा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे, जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केल्यापासून शुक्रवारीपर्यंत फडणवीस आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी या विषयावर कोणतीही चर्चा केली नाही किंवा बैठक घेतलेली नाही.

या आंदोलनापासून एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनीही अंतर
ठेवले आहे. फडणवीस यांच्या सल्लामसलतीने विखे-पाटील यांनी चर्चेची धुरा हाती घेतली होती, अशी माहिती मिंध्यांच्या गटातील एका एका वरिष्ठ मंत्र्यानी दिली.

जरांगे पाटील यांच्याआंदोलनाबाबत शिंदेंशी कुठलीही चर्चा करण्यात आली नाही, अशी माहितीही या मंत्र्याने दिली. मुंबई दौर्‍यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीदरम्यान शिंदे त्यांच्यासोबत होते आणि त्यांनी त्यांच्यासोबत बैठकही घेतली होती, असे ते म्हणाले. तसेच शहा मुंबईतून रवाना झाल्यानंतर शिंदे सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी निघून गेले. पुढील दोन दिवसांचा त्यांचा कार्यक्रम स्पष्ट नाही असेही या मंत्र्याने स्पष्ट केले.