लेबनॉनसोबत थेट चर्चेसाठी इस्रायल तयार, पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा मोठा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लेबनॉनने केलेल्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत नेतन्याहू यांनी लेबनॉनसोबत थेट चर्चा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. इराण आणि इस्रायलमधील संघर्ष शिगेला पोहोचलेला असतानाच, शेजारील देशाशी थेट संवाद साधण्याचा हा निर्णय शांततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

या प्रस्तावित चर्चेचा मुख्य केंद्रबिंदू हिजबुल्ला या सशस्त्र संघटनेचे नि:शस्त्रीकरण करणे हा असेल. लेबनॉनच्या पंतप्रधानांनी बैरूतला लष्करमुक्त करण्याबाबत जे आवाहन केले होते, त्याचे नेतन्याहू यांनी स्वागत केले आहे. दोन्ही देशांच्या सीमांवर सध्या लागू असलेली युद्धविराम स्थिती अत्यंत नाजूक वळणावर असताना ही घडामोड समोर आली आहे. या चर्चेतून दोन्ही शेजारील देशांमध्ये दीर्घकालीन शांतता आणि सुरक्षित संबंध प्रस्थापित करण्याचा इस्रायलचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेला उधाण आले असून, मध्यपूर्वेतील युद्धाचे ढग विरळ होण्यास मदत होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, इस्रायलच्या या निर्णयावर लेबनॉन सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.