अमित शहा यांचे जुनेच भाषण नव्याने, ‘60 वर्षे काँग्रेसने काय केले?’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकसभेत नक्षलवादावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी आज जुनेच भाषण नव्याने केले. ‘‘60 वर्षांत काँग्रेसने काय केले,’’ असा नेहमीचा ‘भाजपछाप’ सवाल करत, शहा यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.

‘‘नक्षलवादाचे मूळ गरिबीत नसून डाव्या कट्टरतावादी विचारधारेत आहे. इंदिरा गांधी यांनी 1970मध्ये राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकण्यासाठी नक्षलवादाला पाठिंबा देणारी ही विचारधारा आपलीशी केली. या विचारधारेमुळेच नक्षलवाद देशात पह्फावला,’ असा आरोप त्यांनी केला. ‘स्वातंत्र्यानंतरच्या 75 वर्षांपैकी 60 वर्षे सत्ता काँग्रेसच्या हाती होती. तरीही आदिवासी समाज विकासापासून वंचित राहिला. याउलट नक्षलवाद वाढत राहिला. नक्षलवादामुळे आतापर्यंत 20 हजारहून लोक मारले गेले आहेत. त्याला काँग्रेसची डावी विचारधाराच जबाबदार आहे,’ असे शहा म्हणाले.

नक्षलवाद्यांसोबत राहून स्वतः नक्षलवादी बनले!

शहा यांनी राहुल गांधींवरही आरोप केले. ‘‘राहुल गांधी हे अनेकदा नक्षलवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांसोबत दिसले आहेत. भारत जोडो यात्रेतही अनेक नक्षली संघटना सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी ओडिशात लाडो शिकोकासोबत व्यासपीठावर होते. हैदराबादमध्ये जी.व्ही. राव यांना भेटले होते. हिडमाच्या समर्थनार्थ करण्यात आलेल्या घोषणाबाजीचे ट्विट राहुल गांधी यांनी केले होते. नक्षलींसोबत राहून स्वतः नक्षलवादी बनले आहेत,’’ अशी टीका शहा यांनी राहुल गांधींवर केली.

नक्षलमुक्तीचे लक्ष्य साध्य

‘‘नक्षलवादमुक्त हिंदुस्थानसाठी आम्ही 31 मार्च 2026ची डेडलाईन निश्चित केली होती. हे लक्ष्य साध्य झाले आहे. आदिवासी पाडय़ांपर्यंत खरा न्याय पोहचला आहे. देश नक्षलवादापासून मुक्त झाला आहे. आज मी ही घोषणा करतो,’’ असे अमित शहा या वेळी म्हणाले.