
काही दिवसांपूर्वी बिग बी अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती’ हा लोकप्रिय शो सोडणार अशी चर्चा होती. त्यामुळे बिग बींचे चाहते काहीसे खट्टू झाले होते. सलमान खान हा शो होस्ट करणार असेही बोलले जात होते. या सर्व चर्चांना स्वतः अमिताभ यांनी पूर्णविराम दिला असून त्यांनी केबीसीच्या 17 व्या सीझनची तयारी सुरू केल्याचे सांगितले. अमिताभ यांनी बुधवारी आपल्या ब्लॉगमधून स्पष्ट केले की, ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या सीझनची तयारी करत आहेत. त्यांनी रिहर्सलचा फोटोही शेअर केला. ‘तयारी सुरू झाली आहे…लोकांना पुन्हा भेटायचे आहे…असे लोक, ज्यांना जीवनात बदल घडवायचा आहे, त्यांच्यासोबत आम्ही आहोत,’ असे अमिताभ यांनी म्हटलंय. केबीसीचा 17 वा सीझन 17 ऑगस्टपासून सोनी लिव्हवर सुरू होणार असल्याचे समजते.