निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली चुकीची माहिती भोवणार, शिंदे गटाच्या अमोल खताळ यांची आमदारकी धोक्यात, हायकोर्टाने याचिका फेटाळली; खटला चालणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिलेली चुकीची माहिती शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या खोटय़ा माहितीप्रकरणी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखल केलेल्या याचिकेला आव्हान देणारी खताळ यांची याचिका हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे प्रतिज्ञापत्रातील चुकीच्या माहितीप्रकरणी खटला चालणार आहे.

भाजप, शिंदे गटाने सत्तेच्या तसेच पैशांच्या बळावर बेकायदेशीर पद्धतीने निवडणूक जिंकल्या असून संगमनेरचे शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनीही गैर मार्गाने निवडणुकीत विजय मिळवल्याचा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. या प्रकरणी थोरात यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली असून जिंकून आलेले आमदार खताळ यांनी उत्पन्नाबाबत चुकीची माहिती प्रतिज्ञापत्रात दिल्याचे याचिकेत म्हटले आहे. मात्र थोरात यांची याचिका फेटाळून लावण्याची मागणी करत खताळ यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती किशोर संत यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली. मात्र न्यायालयाने आमदार खताळ यांचा अर्ज सुरुवातीलाच फेटाळून लावत त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. तसेच प्रतिज्ञापत्रात माहिती दडवणे हा लोकप्रतिनिधी कायद्याच्या अंतर्गत गंभीर विषय असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. दरम्यान मूळ याचिकेवर हायकोर्टाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठासमोर 7 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

थोरात यांचा याचिकेत दावा काय?

शिंदे गटाचे आमदार अमोल खताळ यांनी प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाचे स्रोत आणि कराची थकबाकी जाहीर केली नाही.

खताळ हे ‘नीलकमल’ नावाच्या पंपनीत भागीदार असून जीएसटी विभागाच्या माहितीनुसार, या पंपनीवर सुमारे 54 हजार 650 रुपयांची व्यावसायिक कराची थकबाकी आहे.

आमदार खताळ यांनी निवडणूक अर्जासोबत सादर केलेल्या फॉर्म 26 मध्ये सरकारी थकबाकीच्या रकान्यात निरंक अशी नोंद करत निवडणूक आयोगाची फसवणूक केली होती.

लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलमानुसार ही निवडणूक बेकायदेशीर ठरवण्यात यावी.