
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी ऑक्सिस बँकेतील आपल्या 23 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्ती घेतली आहे. एक्सवरील पोस्टमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
अमृता फडणवीस यांनी 23 वर्षांपूर्वी ऑक्सिस बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी या पदावरून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. ब्रँच ऑपरेशन्स, कॉर्पोरेट बँकिंग, ट्रेझरी, कस्टमर रिलेशन्स अशा बँकेच्या विविध विभागांत त्यांनी काम केले. एक प्रशिक्षणार्थी ते सिनियर व्हाईस प्रेसिडेंट असा कारकिर्दीचा प्रवास झाला. ‘ऑक्सिस बँक हे केवळ माझ्या कामाचे ठिकाण नव्हते तर माझे कुटुंब, शिक्षक आणि दुसरे घरच होते. माझे सहकारी, मार्गदर्शक यांचे मी आभार मानते. विशेषतः बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल मी कृतज्ञ आहे. इथून बाहेर पडताना माझे मन कृतज्ञतेने भरलेले आहे’ असे अमृता फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.



























































