अस्तित्वाची नवी ओळख! अनाया बांगरचा धाडसी निर्णय; वडिलांच्या पाठिंब्याचं जगभरातून कौतुक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि प्रशिक्षक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून अनाया नावाने ओळखू लागली. गेल्या वर्षभरापासून ती आपल्या शस्त्रक्रियेसंदर्भात अनेक निर्णय घेत होती. आता पुन्हा एकदा अनायाने आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय घेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आर्यनने लिंग बदलण्याची शस्त्रक्रिया (Gender Reconstruction Surgery) करून पुन्हा एकदा ‘अनाया’ म्हणून आपली नवीन ओळख जगासमोर मांडली आहे.

अनायाने सोशल मीडियावर एक अतिशय भावूक पोस्ट शेअर करत आपला हा 10 महिन्यांचा ट्रान्सफॉर्मेशन प्रवास चाहत्यांसोबत शेअर केला आहे. यामध्ये तिने स्पष्ट केले की, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी (HRT) आणि शस्त्रक्रियेनंतर तिच्या शरीरात झालेले बदल हे तिच्यासाठी किती महत्त्वाचे होते. “आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी खूप धैर्य लागते, पण स्वतःच्या सत्याचा स्वीकार करण्यासाठी त्याहूनही मोठे धाडस लागते,” अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Anaya Bangar (@anayabangar)

या संपूर्ण प्रवासात संजय बांगर यांनी एका आदर्श वडिलांची भूमिका बजावत आपल्या मुलाच्या निर्णयाचा आदर केला आणि त्याला पूर्ण पाठिंबा दिला. अनायाने आपल्या पोस्टमध्ये वडिलांच्या या खंबीर साथीचा आवर्जून उल्लेख केला आहे. हा प्रवास सोपा नव्हता… केवळ माझ्यासाठीच नाही, तर माझ्या कुटुंबासाठीही. मला समजून घेण्यासाठी, स्वीकारण्यासाठी आणि माझ्या पाठीशी उभे राहण्यासाठी वेळ लागला. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणांपैकी एका क्षणी माझे वडील माझ्यासोबत असणे, हे माझ्यासाठी महत्त्वाचे होते. ही शस्त्रक्रिया माझ्यासाठी एक मोठे पाऊल होते, पण माझे वडील यावेळी माझ्यासोबत असल्यामुळे ते शक्य झाले, असे तिने पोस्टमध्ये म्हटले आहे.

अनाया एक उत्तम क्रिकेटपटू असून तिने स्थानिक स्तरावर क्रिकेट खेळले आहे. मात्र, लिंग बदलण्याच्या प्रक्रियेमुळे तिच्या शरिरात बदल झाल्याने तिला आता महिला क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी आयसीसीच्या (ICC) नियमावलीचा सामना करावा लागू शकतो. तरीही, क्रिकेटवरील तिचे प्रेम कमी झालेले नाही. ही बातमी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या धाडसाचे कौतुक होत असून, अनेकांनी या बाप-लेकाच्या नात्यातील समजूतदारपणाला सलाम केला आहे.