
अंधेरी रेल्वे स्थानकातील मुंबईतील पहिला पादचारी पूल अखेर रविवारी ‘फेरीवालामुक्त’ झाला. कित्येक वर्षे या पुलावर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱया फेरीवाल्यांना अंधेरी पोलिसांनी हटवले. अंधेरी हे पश्चिम रेल्वेवरील एक वर्दळीचे स्थानक असून येथील पादचारी पुलावर विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर महिला सुरक्षेसाठी पोलिसांनी पादचारी पुलावरून फेरीवाल्यांना हद्दपार केले.
मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या आवारात फेरीवाल्यांचे अतिक्रमण चिंतेचा विषय बनला आहे. फेरीवाल्यांच्या समस्येची उच्च न्यायालयानेही दखल घेतली आणि निर्देश दिले, मात्र त्या निर्देशांची अंमलबजावणी काटेकोरपणे झालेली नाही. अंधेरीचा पादचारी पूलदेखील त्यापैकीच एक होता. अनेक वर्षांपासून या पुलावर फेरीवाल्यांनी कब्जा मिळवला होता. पुलाच्या निम्म्या भागापर्यंत साहित्य ठेवले जायचे. त्यामुळे पादचाऱयांना नीट चालणेही मुश्कील बनले होते. सामान्य नागरिकांनी त्याबाबत वारंवार तक्रारी केल्यानंतरही फेरीवाल्यांचे अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. पालिकेने कठोर कारवाई न केल्यामुळे फेरीवाले पुलावरून बाजूला गेले नव्हते. याचदरम्यान महिलांच्या विनयभंगाच्या घटना वाढल्या. त्या घटनांची गांभीर्याने दखल घेत अखेर अंधेरी पोलिसांनी मुख्य पादचारी पुलावरून फेरीवाल्यांना कारवाईचा हिसका दाखवून हटवले. या पुलावरून दररोज पूर्व आणि पश्चिम अशी ये-जा करणाऱया सामान्य नागरिकांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे स्वागत केले जात आहे.
पुलावर पोलीस गस्त घालणार
अनेकदा पालिकेने कारवाई केल्यानंतर दुसऱयाच दिवशी फेरीवाले पुन्हा त्या ठिकाणी येतात. अंधेरीच्या पुलाबाबत तसे घडू शकते. त्या अनुषंगाने अंधेरी पोलिसांनी पादचारी पुलावर गस्त वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत दोन पोलीस तैनात करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱयांनी सांगितले. पुलावर मुलींचा विनयभंग, छेडछाडीच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. त्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी हे कारवाईचे पाऊल उचलले.



























































