
आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील आयुर्वेदिक डॉक्टरांना स्वतंत्रपणे शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. आयुर्वेदिक डॉक्टर 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करू शकणार आहेत. केवळ सर्जिकल स्पेशॅलिटीजमध्ये पदव्युत्तर पदवी धारण करणाऱया आयुर्वेद डॉक्टरांनाच ही परवानगी देण्यात आली असली तरी याला ऍलोपथी डॉक्टरांच्या इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) या संघटनेने जोरदार विरोध केला आहे.
नुकतीच आंध्र प्रदेशचे आरोग्य मंत्री सत्य कुमार यादव यांनी ही घोषणा केली. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, सर्जिकल स्पेशॅलिटीजमध्ये पदव्युत्तर पदवी धारण करणाऱया आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यांना 39 सामान्य शस्त्रक्रिया आणि 19 कान-नाक-घसा आणि नेत्ररोग अशा एकूण 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली आहे. हा निर्णय सरकारने पारंपरिक भारतीय वैद्यकशास्त्राला आधुनिक वैद्यकशास्त्राशी जोडण्याच्या दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. इंडियन मेडिसिन सेंट्रल कौन्सिल रेग्युलेशन्स आणि नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टम्स ऑफ मेडिसिनने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हा निर्णय घेतला आहे, असे यादव यांनी सांगितले.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिलीप भानुशाली म्हणाले, ही मोठी घोडचूक असेल. लोकांच्या जिवाशी खेळ असेल. या निर्णयामुळे मोठय़ा समस्या उद्भवतील. या निर्णयाविरोधात निवेदन देऊन आम्ही विरोध करू.
























































