
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. कारण केंद्र सरकारकडून दिला जाणारा हिस्सा थकला आहे. मानधन मिळत नसल्याने सुमारे दीड लाख कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांना 13,000 रुपये आणि मदतनीसांना 7,500 रुपये मानधन मिळते. त्यात केंद्र सरकारचा वाटा अनुक्रमे 4,500 रुपये आणि 3,500 रुपये आहे. मात्र गेल्या तीन महिन्यांपासून केंद्राचा हा निधी मिळालेलाच नाही. कामाचा डोंगर आणि जबाबदाऱ्या वाढत आहेत; पण मानधन थांबले आहे. हे अन्यायकारक आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आपल्या समाजातील महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहेत. बालकांचे संगोपन, महिलांचे आरोग्य आणि कुपोषणाविरुद्धची लढाई ही सर्व जबाबदारी त्या पार पाडतात. ज्यांच्या खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे, त्यांनाच मानधनासाठी संघर्ष करावा लागतो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जल जीवन मिशन, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना यांसारख्या योजनांचे पैसे केंद्राकडून राज्य शासनाला मिळाले नाहीत. केंद्राकडून निधी न मिळाल्याने अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत अन्याय होत आहे; हे कोणत्याही सरकारसाठी भूषणावह नाही, अशी टीका त्यांनी केली.
मी वारंवार सांगत आलो आहे की, या डबल इंजिन सरकारचे केंद्रातील मेन इंजिन फेल झाले आहे. त्याचा हा आणखी एक सबळ पुरावा आहे. – असेही जयंत पाटील म्हणाले.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या आपल्या समाजातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहेत. बालकांचे संगोपन, महिलांचे आरोग्य, कुपोषणाविरोधातील लढा ही सर्व जबाबदारी त्या प्रामाणिकपणे पार पाडतात. पण दुर्दैवाची बाब म्हणजे, ज्यांच्या खांद्यावर इतकी मोठी जबाबदारी आहे, त्यांनाच आज मानधनासाठी… pic.twitter.com/avZkfLySU0
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) March 31, 2026

























































