उमेद – स्वातंत्र्यातून ‘परिवर्तन’

>> अनघा सावंत

प्रत्येक स्त्रीला स्वातंत्र्य आणि तिला सन्मानाने जगणारी सामाजिक दृष्टी देण्याच्या उद्देशाने कार्य करणारी संस्था म्हणजे परिवर्तन महिला संस्था. डोंबिवली येथे 2000 मध्ये ज्योती पाटकर, प्रज्ञा कुलकर्णी, ज्योती पठानिया, निशिगंधा मोगल आदी समविचारी मैत्रिणींनी एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केली. संस्थेचा मूळ हेतू म्हणजे एका अशा प्रकारच्या समाजाची निर्मिती करणे जिथे प्रत्येक महिला सुरक्षित, आत्मनिर्भर असेल तसेच तिला तिच्या विकासासाठी पोषक वातावरण असेल, हा आहे.

‘मुक्ता बालिका भवन’ हा संस्थेचा महत्त्वाचा प्रकल्प असून अनाथ आणि निराधार मुलींना घर मिळावे, त्यांनी स्वतच्या पायावर उभे राहावे यासाठी 2005 मध्ये संस्थेने टिटवाळा येथे हा प्रकल्प सुरू केला. संस्था मुलींना निवाऱ्यासह त्यांच्या भावनिक आणि सामाजिक गरजाही पूर्ण करून त्यांना उत्तम दर्जाचे, भविष्यासाठी उपयुक्त मूल्यवान शिक्षण प्रदान करते. तसेच ‘आफ्टर केअर’ हा प्रकल्प मुक्ता बालिका भवनचाच एक भाग असून तो 18 वर्षांवरील मुलींसाठी चालवला जातो. समाजाचा महिला, मुलींप्रतीचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला आणि त्याला सामोरे जायला मुलींना तयार करणे हा ‘मुक्ता’चा हेतू आहे. आतापर्यंत 350 हून अधिक मुली मोठय़ा होऊन संस्थेतून बाहेर पडून उत्तम, आनंदी आयुष्य जगत आहेत. संस्थेने 17 मुलींचे त्यांच्या इच्छेनुसार विवाह करून दिले आहेत. याशिवाय घरगुती हिंसेला बळी पडलेली एखादी पीडित महिला जर संस्थेकडे आली तर गरज भासल्यास तिला सुरक्षित निवाराही संस्था देते. बालिका भवनमध्ये सध्या 15 मुली असून पाच मुली ‘आफ्टर केअर’मध्ये आहेत.

‘मुलींच्या सर्वांगीण विकासावर लक्ष देऊन खऱ्या अर्थाने त्यांच्यात परिवर्तन घडवण्याचं कार्य आमची संस्था करते. आज सगळ्या प्रकारच्या क्षेत्रात खूप मोठमोठय़ा पदांवर आमच्या मुली आहेत. तसेच लग्न होऊन गेलेल्या मुलीही माहेरपणासाठी हक्काने संस्थेत येतात. मुलगी संस्थेतून बाहेर गेली तरी ती संस्थेपासून तुटत नाही. संस्थेशी तिची नाळ आई-मुलासारखीच जोडलेली आहे, याचं खूप समाधान आहे.’ अशी भावना संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालक वर्षा परचुरे यांनी व्यक्त केली.

‘दिलासा विरंगुळा केंद्र’ हे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेले ‘आज्यांचं घर’ आहे. कामानिमित्त मुलं घराबाहेर पडल्यावर किंवा बाहेरगावी गेल्यावर काही ज्येष्ठ नागरिकांना डे केअर सेंटरची गरज भासते. हे लक्षात घेऊन संस्थेने ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘डे केअर सेंटर कम रिािढएशन सेंटर’ सुरू केले. जिथे हे ज्येष्ठ एक दिवस किंवा काही दिवस येऊ शकतील, राहू शकतील, मात्र ज्यांचे कोणीच नाही अशा काही जणी संस्थेकडे आल्यावर दिलासा केंद्राने त्यांना कायमस्वरूपी निवाराही दिला. सध्या अशा 13 आज्या आनंदाने केंद्रात वास्तव्यास आहेत. गरज भासल्यास संस्था ज्येष्ठांच्या घरी जाऊन त्यांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणीही सोडवते. डोंबिवलीतील 180 ज्येष्ठ सध्या या केंद्राचे सभासद आहेत.

‘मोखाडा गावविकास प्रकल्प’ याअंतर्गत संस्था पालघर जिह्यातील मोखाडा तालुक्यातील 70 गावांबरोबर काम करते. कोणत्याही संस्थांची कसलीही मदत लागू नये इतके या लोकांनी सक्षम व्हावे यासाठी संस्था सातत्याने प्रयत्नशील असते.